नागपुरातून फडणवीस, मते, खोपडे, मेघे रिंगणात; सावरकर यांच्याऐवजी कामठीतून बावनकुळे
By योगेश पांडे | Published: October 20, 2024 05:30 PM2024-10-20T17:30:40+5:302024-10-20T17:30:54+5:30
उर्वरित सहा जागांवर कोण, ‘बीजेपी’तील इच्छुकांचा ‘बीपी’ वाढला
नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे, मोहन मते व समीर मेघे यांना परत संधी देण्यात आली आहे. तर ‘लाडकी बहीण’च्या ‘जुगाड’ वक्तव्यामुळे चर्चेत आलेले टेकचंद सावरकर यांचे कामठीतील तिकीट कापण्यात आले असून तेथून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक लढविणार आहेत. रामटेक वगळता जिल्ह्यातील उर्वरित सहा जागांवर पक्षाकडून कोण लढणार हे गुलदस्त्यात असून इच्छुकांची धाकधूक आणखी वाढली आहे.
भाजपच्या बहुप्रतिक्षित यादीची रविवारी दुपारी घोषणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), मोहन मते (नागपूर-दक्षिण), समीर मेघे (हिंगणा) यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी येथून २०१९ साली नाट्यमयरित्या बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. त्यामुळे ते निवडणूक लढतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र केंद्रीय भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बावनकुळे यांना कामठीतून लढण्याची सूचना करण्यात आली व त्यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीरदेखील करण्यात आले.
पश्चिम, मध्यमध्ये उमेदवारीवरून संभ्रम कायम
नागपूर शहरातील सहापैकी केवळ तीन जागांवरील उमेदवारच जाहीर करण्यात आले आहेत. मध्य नागपुरातून आ.विकास कुंभारे यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनीदेखील दावा केला आहे. येथील मुस्लिम, हलबा मतदारांचे प्राबल्य लक्षात घेता या जागेबाबत अद्याप केंद्रीय निवडणूक समितीने अंतिम निर्णय घेतलेला नाही. तसेच पश्चिम नागपुरातूनदेखील दयाशंकर तिवारी, नरेश बरडे, संदीप जोशी यांच्या नावांची चर्चा आहे. तर नगरसेविका परिणिता फुके यांनीदेखील उमेदवारीसाठी दावा केला आहे. येथील नावदेखील होल्डवर ठेवण्यात आले आहे. उत्तर नागपुरातून भाजपकडूनच माजी आमदार डॉ.मिलींद माने, डॉ.संदीप शिंदे, ॲड.धर्मपाल मेश्राम, अविनाश धमगाये, संदीप गवई, संदीप जाधव हे इच्छुक आहे. तेथून कोणते नाव अंतिम होईल, याबाबत शहर पदाधिकाऱ्यांमध्येदेखील संभ्रम आहे.
जिल्ह्यातील तीन जागांचे काय ?
हिंगणा व कामठी मतदारसंघातील नाव अंतिम झाले असले तरी उमरेड, सावनेर, काटोल या तीन जागांबाबत फैसला झालेला नाही. या तीनही जागांबाबत केंद्रीय भाजपाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. या तीनही जागा भाजपला मागील वेळी गमवाव्या लागल्या होत्या. उमरेडमधील आ.राजू पारवे हे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना परत संधी मिळते की पक्षाकडून दुसरा विचार होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.