आघाडी जमली, सेना स्वबळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:01+5:302021-07-07T04:09:01+5:30
नागपूर : आठवड्याभरापासून काँग्रेस-राष्ट्रवादीचा रेंगाळत चाचलेला तिढा अखेरच्या दिवशी सुटला. काँग्रेस आता १६ पैकी १० जागांवर लढणार असून, राष्ट्रवादीला ...
नागपूर : आठवड्याभरापासून काँग्रेस-राष्ट्रवादीचा रेंगाळत चाचलेला तिढा अखेरच्या दिवशी सुटला. काँग्रेस आता १६ पैकी १० जागांवर लढणार असून, राष्ट्रवादीला ५ व शेतकरी कामगार पक्षासाठी १ जागा सोडली आहे; परंतु सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने स्वबळावर १२ जागी उमेदवार मैदानात उतरविले आहे. दरम्यान, काँग्रेसने गोधनी रेल्वे सर्कलच्या विद्यमान सदस्य ज्योती राऊत यांना बदलवून कुंदा राऊत यांना उमेदवारी दिली आहे.
आघाडीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत आपापल्या जागा ते लढविणार होते; परंतु भाजपच्या ज्या चार जागा रिक्त झाल्या होत्या त्यावर एकमत होत नव्हते. पण वेळेवर तिढा सुटला यातील राजोला, गुमथाळा, निलडोह या तीन जागी काँग्रेसने उमेदवारी दिली, तर इसासनी सर्कलमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिला. काँग्रेसने उमेदवारी देताना फारसा बदल केला नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले मनोहर कुंभारे यांचा सर्कल महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर गोधनी रेल्वेच्या विद्यमान सदस्य ज्योती राऊत यांना वगळून काँग्रेस कमिटीच्या सचिव कुंदा राऊत यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादीनेही उमेदवार कायमच ठेवले. गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचा पारडसिंगा सर्कल महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी शारदा कोल्हे यांना रिंगणात उतरविले, तर भिष्णूरच्या विद्यमान सदस्य पूनम जोध यांच्या जागी त्यांचे पती प्रवीण जोध यांना रिंगणात उतरविले. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्यासोबत शेकापला सोबत घेत एक जागा दिली.
- बारा सर्कलमध्ये शिवसेनेचे उमेदवार
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता असली तरी, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला आघाडीसंदर्भात विचारातच घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेने १२ सर्कलमध्ये उमेदवारी देऊन एकप्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीलाच आव्हान दिले आहे.