फ्रंट लाईन, हेल्थ केअर वर्करलाही घेता येणार कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 07:11 PM2023-06-22T19:11:33+5:302023-06-22T19:12:06+5:30
Nagpur News ‘इन्कोव्हॅक’ हा कोरोना प्रतिबंधक डोस ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला देण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेने घेतला.
सुमेध वाघमारे
नागपूर : ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना ‘बूस्टर डोस’च्या स्वरुपात नाकावाटे घेण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला ४ मेपासून सुरुवात झाली. परंतु आतापर्यंत दहाच नागरिकांनी हा डोस घेतला. यामुळे आता हा डोस ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला देण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेने घेतला.
कोरोनाचा विषाणू सामान्यत: नाकातून शरीरात प्रवेश करतो. यामुळे नाकातील पडद्यावरच (लोकल) ‘इम्युनिटी’ म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि विषाणूपासून बचाव करण्यासाठी नाकावाटे घेण्यात येणारी लस निर्माण करण्यात आली. भारत बायोटेकच्या या ‘नेझल व्हॅक्सिन’ ‘इन्कोव्हॅक’ला १८ वर्षांवरील नागरिकांना बुस्टरच्या स्वरुपात देण्याला मंजुरी मिळाली. नागपुरात ४ मे पासून ६० वर्षांवरील नागरिकांना महाल येथील मनपाच्या रोग निदान केंद्रात डोस उपलब्ध करून देण्यात आले. परंतु दीड महिन्याचा कालावधी होऊनही दहावर नागरिकांनी डोस घेतला नाही. यामुळे आता ‘फ्रंट लाईन’ व ‘हेल्थ केअर वर्कर’ला हा डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव नाही. यामुळे ‘हेल्थ के अर वर्कर’ डोस घेतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.