नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:44 AM2017-08-10T03:44:29+5:302017-08-10T03:44:29+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढण्यात आला.
नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर मोर्चा काढण्यात आला. समितीचे नेते ज्येष्ठ माजी आमदार वामनराव चटप यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा अर्धा किलोमीटर गेल्यानंतर गांधी चौकात पोलिसांनी अडविला. पोलिसांच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘भाजपा..., तुला विदर्भावर भरोसा नाही का’, असा सवाल करीत सरकार व भाजपा नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
इतवारीतील विदर्भ चंडिका मातेच्या मंदिरात आरती करून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनात भजन, लोकगीत, आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न झाला. क्रांतिदिनी ‘भाजप सरकार चले जावो’ असा नाराही चटप यांनी दिला. मोर्चाला अपेक्षेप्रमाणे खूपच कमी प्रतिसाद मिळाला.
मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे-पाटील, समितीचे संयोजक राम नेवले, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर, रिपाइंचे आनंदराव बागडे आदीं सहभागी झाले होते.
२८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी
२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारात विदर्भाच्या सर्वांगीण विकासाची हमी देण्यात आली होती. मात्र, हा करार पूर्णपणे कुचकामी ठरला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी विदर्भभरात या कराराची होळी केली जाईल. - वामनराव चटप, ज्येष्ठ नेते, विदर्भ आंदोलन समिती.