स्वतंत्र विदर्भासाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा

By admin | Published: June 2, 2016 03:21 AM2016-06-02T03:21:42+5:302016-06-02T03:21:42+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने नागपूरच्या विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

Front for Winter Vidarbha in the Winter Session | स्वतंत्र विदर्भासाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा

स्वतंत्र विदर्भासाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा

Next

विदर्भ प्रदेश विकास परिषद : दत्ता मेघे यांची माहिती
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने नागपूरच्या विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विदर्भातील अकराही जिल्ह्यातून प्रत्येकी १ हजार सदस्य पांढऱ्या पोशाखात या मोर्चात सहभागी होतील. शिस्तबद्ध पद्धतीने विधान भवनावर पोहोचून मोर्चातर्फे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि मागणीचे निवेदन सादर करेल. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही केली जाईल. विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा पुढील डिसेंबरपर्यंतचा कार्यक्रम जाहीर करतांना दत्ता मेघे यांनी ही माहिती दिली.
विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणी आणि सर्व जिल्हा अध्यक्षांच्या संयुक्त बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विदर्भातील सर्व जिल्ह्यात परिषदेने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली आहे. जून महिन्यापासून डिसेंबरपर्यंत कार्यक्रम राबविण्यात येईल.
जून महिन्यात स्वामीनाथन आयोग लागू करा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक जिल्ह्यातून पंतप्रधानांना पाठविण्यात येईल. जुलै महिन्यात ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करा याची मागणी केली जाईल. १४ आॅगस्ट रोजी सेवाग्राम आश्रमात चिंतन शिबिर होईल. सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कार्यकारिणी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक होईल. आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हापातळीवर बैठका घेण्यात येतील.
या बैठकीला आमदार चरण वाघमारे, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, गिरीधरबाबू राठी, प्रतापसिंह चव्हाण, साधना सराफ, विष्णुपंत मेहरे, मनोरमा जयस्वाल, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, नगरसेवक हरीश डिकोंडवार आदी उपस्थित होते.
संचालन डॉ. राजू मिश्रा यांनी केले. महमूद अन्सारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Front for Winter Vidarbha in the Winter Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.