नागपुरात सुपारी गोदामावरील धाडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:53 PM2019-01-30T23:53:44+5:302019-01-30T23:54:37+5:30
गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे.
पोलिसांनी मंगळवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरातील एका सुपारी गोदामावर धाड टाकली. येथे मोठ्या प्रमाणावर सुपारी ठेवली होती. पोलीस दलासोबत उत्तर नागपुरातील एक चर्चित गुन्हेगारही होता. त्याच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी गोदामावर धाड टाकली होती. पोलिसांनी एफडीए अधिकाऱ्यांना या कारवाईची सूचना देऊन त्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपारी व्यापारीही गोदामावर आले. ते पोलीस कारवाईच्या विरुद्ध नारेबाजी करू लागले. व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की, पोलिसांनी गुन्हेगाराच्या इशाऱ्यावर कारवाई केली आहे. या गुन्हेगाराविरुद्ध खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. तो व्यापाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून खंडणी मागतो. खंडणी न दिल्यास पोलीस व एफडीएला माहिती देऊन कारवाईची धमकी देतो. तो गेल्या दोन दिवसांपासून गोदाम मालकाला खंडणीसाठी धमकावीत होता. त्याच्या धमकीला भीक न घातल्याने तो पोलिसांना सोबत घेऊन आला.
व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान एफडीएची चमू गोदामाला सील लावून निघून गेली.
या कारवाईच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना गुन्हेगार व इतर स्वयंघोषित नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी पोलिसांकडून भविष्यात व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. यानंतर व्यापाऱ्यांनी एफडीए अधीक्षक शशिकांत केकरे यांचीही भेट घेतली. त्यांनीही संशयास्पद तक्रारीच्या आधारावर कारवाई न करण्याचे आश्वासन दिले.