संत्रा उत्पादकांपुढे फळगळतीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:39+5:302021-08-27T04:10:39+5:30
नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह ...
नागपूर : बदलते वातावरण आणि दमट हवामान यामुळे आता विदर्भातील संत्रा उत्पादकांसमोर फळगळतीचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, मोर्शी आणि परतवाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्राबागांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या चमूने अलीकडेच नागपूर जिल्ह्यासह चांदूर बाजार आणि परतवाडा भागात होणाऱ्या संत्रा फळगळीचा आढावा घेतला. चांदूर बाजार तालुक्यातील नानोरी, वणी, माधान, काजळी, जासापूर आणि पिंब्री तसेच परतवाडा तालुक्यातील सावली, दतुरा, एकलासपूर आणि तोंडगाव व मोर्शी तालुका फळगळीने सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र असल्याचे या पाहणीतून पुढे आले. जुलै ते ऑगस्ट या काळात शेतकऱ्यांचे सुमारे १० ते ४० टक्के नुकसान झाल्याचे या पाहणीत पुढे आले आहे.
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील मृदा विज्ञान विभागाचे डॉ. ए. के. श्रीवास्तव आणि फलोत्पादन विभागाचे डॉ. ए. डी. हुच्चे यांच्या नेतृत्वात दोन चमूंनी शेतकऱ्यांच्या संत्राबागांवर जाऊन निरीक्षणे नोंदविली. या चमूने फळगळीच्या समस्येचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि उपाययोजना सुचविल्या. व्यवस्थापन हे यातील कारण असल्याचे मत चमूतील सदस्यांनी नोंदविले.