झाडीपट्टीतील कलावंतांना मिळणार ‘एफटीआय’चे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:31 AM2018-08-24T11:31:42+5:302018-08-24T11:33:55+5:30

झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांना चित्रपट कलेचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पुढाकार घेत फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआय)शी करार केला आहे.

'FTI' training for artists will be given to the Zadipatti artistes | झाडीपट्टीतील कलावंतांना मिळणार ‘एफटीआय’चे प्रशिक्षण

झाडीपट्टीतील कलावंतांना मिळणार ‘एफटीआय’चे प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बार्टी’चा पुढाकारपूर्व विदर्भातील २० नवोदित कलावंतांची निवड

आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असे म्हटले जाते की कला ही उपजत असते. परंतु आजच्या काळात कुठल्याही कलेला शास्त्रोक्त प्रशिक्षणाची जोड मिळाली तर प्रसिद्धी आणि पैसा मागे चालत येतो, ही वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. आज देशात अशा अनेक दर्जेदार प्रशिक्षण संस्था आहेत. मात्र पैशांअभावी अनेक गुणी कलावंतांना त्या संस्थेपर्यंत पोहोचणेच शक्य होत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेत झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांनाही चित्रपट कलेचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पुढाकार घेत देशातील नावाजलेल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआय)शी करार केला आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया हा मागासलेला भाग. झाडीपट्टीसारखी रंगभूमी येथे समृद्ध आहे. अनेक कलावंत येथे आहेत. त्यांना चांगले प्रशिक्षण मिळाले तर त्यांच्यासाठी व पर्यायाने त्यांच्या कुटुंबासह समाजाच्या विकासात एक चांगले योगदान होईल, या उद्देशाने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना एफटीआय प्रशिक्षणाची संकल्पना सुचली. ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे यांनी ही संकल्पना उचलून धरली. पुणे येथील ‘एफटीआय’ या संस्थेशी यासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांसाठी काही प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यास तयारी दर्शविली. ‘बार्टी’तर्फे सध्या पूर्व विदर्भातील २० नवोदित कलावंतांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात येत आहे. त्यांच्या प्रशिक्षणाची व राहण्याची-खाण्याची सर्व व्यवस्था ‘बार्टी’तर्फे नि:शुल्क करण्यात येणार आहे.
झाडीपट्टी रंगभूमीने आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नावाजलेले कलावंतही आता झाडीपट्टीत हौसेने येऊ लागले आहेत. असे असले तरी या रंगभूमीला अजूनही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एखाददुसरा कलावंतच मुंबई-पुण्यापर्यंत मजल मारताना दिसतो. परंतु आता झाडीपट्टीतील नवोदित कलावंतांनाही ‘एफटीआय’सारख्या नावाजलेल्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेता येईल. त्यातून त्यांची कला आणखीनच उभारून येईल, शिवाय या संस्थेमध्ये अनेक नावाजलेले, दिग्गज कलावंत शिकवायला येत असल्याने तेथील अनुभवाचा फायदाही या नवोदित कलावंतांना नक्कीच होईल.

असा राहणार अभ्यासक्रम
एफटीआयमध्ये विविध कालावधीचे अभ्यासक्रम राहतील. यात १० दिवस, २० दिवसांचा समावेश राहील.
अभिनय, डिजिटल छायाचित्रण, पटकथा, लेखन, टीव्ही लेखन हे विषय शिकविणार
स्मार्टफोनवर चित्रपटनिर्मिती हा १० दिवसांच्या अभ्यासक्रमाचाही समावेश राहील.

बार्टीतर्फे राबविण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सध्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत केवळ २० विद्यार्थ्यांसाठी ‘स्क्रीन अ‍ॅक्टिंग’ हा फाऊंडेशन कोर्स राहणार आहे. याला मिळालेल्या प्रतिसादानंतर यात आणखी वाढ केली जाणार आहे. या माध्यमातून पूर्व विदर्भातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट माध्यम जवळून समजता यावे आणि त्यांच्यासाठी संधी खुली व्हावी, हा मुख्य उद्देश आहे.
-पंकज माने, प्रकल्प संचालक, बार्टी नागपूर.

Web Title: 'FTI' training for artists will be given to the Zadipatti artistes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.