..तर ८० टक्के पेट्रोल पंप ‘ड्राय’ होणार'; शहरातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 02:05 PM2022-05-30T14:05:17+5:302022-05-30T14:18:54+5:30

सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे.

Fuel shortage at many pumps in city, Many fuel stations go dry in Nagpur, consumers in a fix | ..तर ८० टक्के पेट्रोल पंप ‘ड्राय’ होणार'; शहरातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा

..तर ८० टक्के पेट्रोल पंप ‘ड्राय’ होणार'; शहरातील अनेक पंपांवर इंधनाचा तुटवडा

Next
ठळक मुद्देपंपांना होतो एक वा दोन दिवसाआड पुरवठा : नफा कमी, गुंतवणूक वाढली, डिझेलचा तुटवडा

नागपूर : हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही कंपन्यांपैकी हिंदुस्थान आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी केला आहे. केवळ इंडियन ऑईलमुळे शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा होत आहे. मार्चपासून स्थिती बिघडली असून पुढे आणखी बिकट होणार आहे. जर इंडियन ऑईलने पुरवठ्यात कपात केली तर शहरातील ८० टक्के पंप बंद होण्याची भीती काही डीलर्सनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. हीच स्थिती संपूर्ण देशात आहे.

खरेदी बंद आंदोलन

सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन ३१ मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. हा लढा न्याय्य हक्कासाठी असल्याचे पेट्रोलियम डीलर्सचे मत आहे.

एचपीसीएल आणि बीपीसीएलचे पंप जास्त प्रमाणात बंद

कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमागे २० ते २५ रुपये लिटरची वाढ हवी आहे. पण ही वाढ पेट्रोलियम मंत्रालय करू देत नाही. त्यामुळे कंपन्या पंपांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी प्रमाणात करीत आहेत. डीलर्स म्हणाले, पूर्वी दोन ते तीन दिवसांच्या उधारीवर कंपन्या पंपांना इंधनाचा पुरवठा करायच्या, पण आता आगाऊ रोख रक्कम भरूनही दोन दिवसानंतर टँकर पंपावर पोहोचत आहे. तोपर्यंत पंपाबाहेर इंधन नसल्याचा बोर्ड लावावा लागतो. असे बोर्ड एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या पंपांबाहेर जास्त दिसून येत आहेत.

एचपीसीएलच्या पंपावर लाखोंचे ऑईल विक्रीविना पडून

एचपीसीएलने पंपचालकांना लाखो रुपयांचे ऑईल विक्रीसाठी पाठविले. पण पंपावर ऑईलची विक्री नगण्य आहे. तेच ऑईल बाजारात कमी किमतीत मिळते. त्यामुळे ग्राहक पंपावर ऑईल खरेदी करीत नाहीत. एचपीसीएलच्या प्रत्येक पंपावर २५ ते ३० लाख रुपयांचे ऑईल विक्रीविना पडून असल्याचे डीलर्सनी सांगितले. त्यामुळे पंपचालकांनी गुंतवणूक वाढली असून पुढे शेतकऱ्यांप्रमाणे पंपचालकही आत्महत्या करतील, असे काही डीलर्स म्हणाले.

कंपन्यांनीच लावली उधारीची सवय

विक्री वाढविण्यासाठी कंपन्या पूर्वी पंपचालकांना लाखो रुपयांचे इंधन उधारीवर द्यायच्या. पण आता शहरासह महामार्गावरील पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे ग्राहक पंपचालकांना पूर्वीची उधारी देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पंपचालक संकटात आले आहेत. पंपचालकांना कंपन्यांनीच उधारीची सवय लावली, पण आता तेच इंधन देण्यास नकार देत असल्यामुळे आम्ही अडचणीत आल्याचे डीलर्सनी सांगितले.

गुंतवणूक वाढली, कमिशन केवळ ३.७८ रुपये

पेट्रोलवर डीलर्स कमिशन केवळ ३.७८ रुपये आहे. त्यात अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. दुसरीकडे पेट्रोलची किंमत ११० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे १२ हजार लिटर टँकरसाठी जवळपास १४ लाख रुपये लागतात. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत पंप बंद ठेवता येत नाही. त्यामुळे पंपचालकांना नाईलाजाने पेट्रोल व डिझेल विक्रीसाठी बोलवावे लागते. केंद्र सरकार आणि कंपन्यांच्या धोरणामुळे आता कुणीही पंप चालविण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे डीलर्स म्हणाले..

Web Title: Fuel shortage at many pumps in city, Many fuel stations go dry in Nagpur, consumers in a fix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.