फरार आरोपीला छत्तीसगडमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:11 AM2018-04-22T01:11:54+5:302018-04-22T01:12:04+5:30
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली.
पायी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला १३ मार्च रोजी आरोपी अजहरने घरी सोडून देतो, असे म्हणून आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. ही घटना दुसऱ्या कुणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकीही दिली. पीडित मुलीने त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अजहरविरुद्ध बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी नागपुरातून फरार झाला. तो नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये लपून वारंवार आपले लोकेशन बदलवत होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना अडचण होत होती. दोन दिवसांपूर्वी तो छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये दडून असल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी त्याच्या अटकेसाठी नंदनवन ठाण्याचे एक पोलीस पथक तेथे पाठविले. या पथकाने बिलासपुरात जाऊन आरोपी अजहरच्या मुसक्या बांधल्या. त्याला शुक्रवारी नागपुरात आणण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला अटक केली.
परिमंडळ ४ चे उपायुक्त नीलेश भरणे, सक्करदरा विभागाचे सहायक आयुक्त कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार माणिल नलावडे, द्वितीय निरीक्षक साळुंके, सहायक निरीक्षक धाडगे, उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण, नायक अमोल जसूद, दीपक तऱ्हेकर, दीपक बेलसरे, अभिषेक शनिवारे यांनी ही कामगिरी बजावली.