वूशु स्पर्धेच्या नावाखाली जीवघेणा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:45 AM2017-09-08T01:45:23+5:302017-09-08T01:45:41+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या यजमानपदाखाली मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वूशु स्पर्धेत तब्बल सात खेळाडू जखमी झाले. कुणाचे नाक फुटले तर कुणाचा हात तुटला. कुणाच्या कंबरेचे हाड दुखावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या यजमानपदाखाली मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वूशु स्पर्धेत तब्बल सात खेळाडू जखमी झाले. कुणाचे नाक फुटले तर कुणाचा हात तुटला. कुणाच्या कंबरेचे हाड दुखावले. कुणाला पायाची दुखापत झाली. या जखमी खेळाडूंची साधी दखल घेणारे स्पर्धा स्थळी कुणीही नव्हते. प्रथोमपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली नव्हती.
१७ आणि १९ वर्षे गटाच्या मुलामुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत दुसºया दिवशी सात जण जखमी झाल्याची माहिती एका जखमी मुलाच्या पालकाने पुराव्यानिशी दिली. भोसला मिलिटरी स्कूलच्या एका मुलाचे नाक फुटले तरी रेफ्रीने फाईट थांबविली नव्हती. दुसºया एका मुलीला प्रतिस्पर्धी स्पर्धकाने पाठीचा कणा मोडेपर्यंत वाकवले तरी रेफ्री लक्ष द्यायला तयार नव्हते. पालकांनीच मध्यस्थी करीत ही फाईट सोडविली तेव्ही जखमी मुलगी सारखी ओरडत होती पण तिच्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नव्हते. या पालकानेच पाणी पाजल्यानंतर ती खासगी दवाखान्याकडे रवाना झाली.
भोसला मिलिटरी स्कूलमध्ये १२ वीत असलेल्या अक्षय साकोरेच्या डाव्या हाताचे हाड मोडले. त्याच्या पालकाने प्रथमोपचाराची मागणी केली तेव्हा सर्वांनी चेहरे लपवित स्पर्धा स्थळाहून काढता पाय घेतला. स्पर्धा निरीक्षक अरुण बुटे आणि संचालन करणारे जिल्हा वूशु संघटनेचे सचिव दीपक बिसेन हे दोघेही नव्हते.अक्षयच्या पालकाने मुलाला आधी मेयो व नंतर खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केला. अन्य जे खेळाडू जखमी झाले त्यांच्या पालकांनी संघटनेच्या पदाधिकाºयांशी वैर नको ,असा सावध पवित्रा घेत झालेला त्रास निमूटपणे सहन केला. मुले जखमी झाली तरी असे पालक तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत.
जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडे यांच्याशी संंपर्क केला असता ते ‘ आऊट आॅफ रिच’होते. बुटे यांना निरोप दिला पण त्यांनीही संपर्क करण्याचे टाळले. बिसेन यांना विचारणा केली असता मी बाहेर होतो व स्पर्धास्थळी प्रथमोपचाराची सोय नव्हती हे मान्य केले. क्रीडा कार्यालयाने सोपविलेली जबाबदारी आपण पार पाडल्याचे त्यांचे मत होते. रेफ्रीने लढत थांबविली होती, पण खेळाडूंच्या कोचकडूनच लढत सुरू ठेवण्याची मागणी झाल्याने नाईलाजाने जखमी होईस्तोवर खेळ सुरू ठेवण्यात आल्याचे बिसेन यांचे म्हणणे होते.
दुसरीकडे पालकांनी रेफ्रीचा स्पर्धा घेण्याचा दृष्टिकोन कॅज्युअल असल्याने वूशुच्या नावावर केवळ ‘रोड फाईट’ खेळविण्यात आल्याचा आरोप केला. काही पालकांनी लढतींचे चित्रीकरण केले आहे. त्यात प्रतिस्पर्धी खेळाडू केवळ हाणामारी करीत असल्याचे दिसत आहे. जखमी मुलांची जबाबदारी केवळ पालकांनीच घ्यायची काय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खबरदारीचा उपाय करायला नको का, अशी विचारणा अनेकांनी केली.