पोलीस भरतीमध्ये कटकारस्थान, टोळी फरार; तीन वर्षे होऊनही छडा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 01:03 PM2022-03-23T13:03:09+5:302022-03-23T13:27:03+5:30
शहर पोलिसांनी गिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल करून अनेकांची धरपकड केली. मात्र, उपरोक्त पाच आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी शहर पोलिसांनी या आरोपींना फरार घोषित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस बनविण्यासाठी कटकारस्थान करणारी औरंगाबाद जिल्ह्यातील टोळी शहर पोलिसांना अद्याप गवसलेली नाही. तीन वर्षे होऊनही त्यांचा शोध घेण्यात अपयश आल्याने पोलिसांनी मंगळवारी या टोळीला फरार घोषित केले.
विशाल भागचंद लकवाल (वय २१, रा. रघुनाथपूर, वैजापूर, जि. औरंगाबाद), मिथून गबरुसिंग बमनावत (२१, रा. संजरपूरवाडी, जि. औरंगाबाद), शिवाजी एकनाथ पवार (३०, रा. माहिंदा तापा), प्रदीप कल्याणसिंग बैनाडे (२३, रा. बेंदेवाडी दुधाळा) अशी या आरोपींची नावे असून, त्यांच्या पाचव्या आरोपीचे नाव आणि पत्ता पोलिसांना अद्याप कळलेला नाही.
पोलीस भरतीसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेत एकाच्या जागी दुसऱ्याला बसवून ही टोळी संबंधित उमेदवाराकडून लाखो रुपये उकळत होती. विशेष म्हणजे, या टोळीने आपले नेटवर्क राज्यभरात विस्तारले होते. नागपुरात २०१९ ला झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेतही या टोळीने असाच गैरप्रकार केला. मात्र, तो उघड झाल्यानंतर शहर पोलिसांनी गिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल करून अनेकांची धरपकड केली. मात्र, उपरोक्त पाच आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी शहर पोलिसांनी या आरोपींना फरार घोषित केले.
माहिती देण्याचे आवाहन
संबंधित आरोपींबाबत कुणाला काही माहिती असेल, तर त्यांनी गुन्हे शाखेसोबत संपर्क करावा, असे आवाहन शहर पोलिसांनी मंगळवारी एका पत्रकातून केले आहे.