राज्यात भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे पळपुटे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:15+5:302021-09-21T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा शहर व जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा शहर व जिल्हा भाजपकडून निषेध करण्यात आला. सोमय्या यांना ताब्यात घेण्याची ठाकरे सरकारची युक्ती म्हणजे पळपुटेपणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचाच प्रकार असून, यामुळे राज्यातील भ्रष्टाचारास पाठबळ मिळत आहे, असा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी सोमवारी केला.
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून तो उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याच्या धोरणामुळेच ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. केवळ दडपशाही करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आता सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यासाठी सरकारचेच मंत्री सरसावले आहेत, हेच सोमय्या यांच्यावरील कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे, असे प्रतिपादन दटके यांनी केले.
पोलीस केवळ बघ्याच्याच भूमिकेत
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे खंडणीप्रकरणी कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी लपून आहेत. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान असलेल्या अतिरेकी कारवायांचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत असताना राज्याचे पोलीस दल मात्र सोमय्या यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईसाठी बळ वाया घालवत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडवत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप दटके व गजभिये यांनी लावला.