फरार ठकबाज कोल्हे बंधूंवर भिलाईतही गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:07+5:302021-01-21T04:09:07+5:30
नागपूर : गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज व बोनस देण्याचे आमिष दाखवून नागपुरात ३५ कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या ...
नागपूर : गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज व बोनस देण्याचे आमिष दाखवून नागपुरात ३५ कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या कोल्हे बंधू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भिलाई पोलिसांनीसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या ठकबाजांनी भिलाई स्टील प्लांटच्या सेवानिवृत्त डीजीएमसह अनेकांची फसवणूक केली आहे.
७ नोव्हेंबर २००९ रोजी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी सुशील कोल्हे (२९), त्याचा भाऊ पंकज कोल्हे (२७) आणि सहकारी भरत साहू यांच्याविरुद्ध फसवणूक तथा एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. कोल्हे बंधू व त्याचे सहकारी सिव्हिल लाईन्स येथील उत्कर्ष अलंकार अपार्टमेंटमध्ये डिजिटल ॲडव्हरटाईजमेंट कंपनी एजीएम कॉर्पोरेशन चालवित होते. ते शहरातील चौकांवर डिजिटल बोर्ड लावून मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींचे कंत्राट घेत असल्याचे सांगून लोकांना गुंतवणुकीसाठी आपल्या जाळ्यात फसवले. सुरुवातीला एजेंट व गुंतवणूकदारांना व्याज व बोनसही दिले. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आपले जाळे पसरविले. गुंतवणूकदारांची संख्या खूप वाढल्यावर व्याज व बोनस देणे बंद करून कोल्हे बंधू फरार झाले. पीडितांनी आपले पैसे परत मिळतील याची खूप वाट पाहिली. परंतु पैसे मिळणार नाहीत, हे समजल्यावर लोकांनी कोल्हे बंधूंविरुद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान, सुशील कोल्हेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलीसही तेव्हा मागेपुढे पाहत होते.
कोल्हे बंधूंनी भिलाई स्टील प्लांटचे सेवानिवृत्त डीजीएम प्रल्हाद सिंह यांची ५६ लाखाने फसवणूक केली होती. सिंह यांनी एप्रिल २०१८ मध्ये कोल्हे बंधूंकडे गुंतवणूक केली होती. सिंह यांच्या तक्रारीवरून भिलाई पोलिसांनी सुशील कोल्हे त्याचा भाऊ पंकज कोल्हे, भरत साहू, विजय उईके, हरीश गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
७ नोव्हेंबर रोजी दाखल प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हे बंधूंद्वारे फसवल्या गेलेले अनेक पीडित तक्रार करण्यासाठी आर्थिक शाखेकडे येत आहेत. चार महिन्यानंतरही कोल्हे बंधू पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असंतोष आहे.
बॉक्स
पीडित डॉक्टरही बनला आरोपी
सुशील कोल्हेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी डॉक्टर आशीष जैन यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला होता. डॉ. जैन यांनी कोल्हे बंधूंकडे १५ लाखांची गुंतवणूक केली होती. रुपये परत न केल्याने ते पैसे परत मागत होते. सुशील त्यांना बोगस प्रकरणात फसवण्याची धमकी देत होता. डॉक्टरने सव्वा वर्षांपूर्वी कोल्हे बंधूंची पोलिसात तक्रारही केली होती.