पौर्णिमा उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:01 AM2018-08-28T01:01:47+5:302018-08-28T01:04:43+5:30
ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात सुरू असलेल्या पौर्णिमा दिवस उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी केले.
पौर्णिमेच्या निमित्ताने महापालिका आणि ग्रीन व्हिजीलच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासाठी शहरातील एका चौकात जनजागृती अभियान राबविले जाते. सोमवारी चिल्ड्रेन ट्राफिक पार्क समोरील चौकात जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात अनिल सोले यांनी सहभागी होऊ न स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. स्वयंसेवकांसोबत त्यांनीही व्यापाऱ्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांनीही मार्गदर्शन केले. जनजागृती अभियानात कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, सचिन फादे, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसरकर, कल्याणी वैद्य, विष्णूदेव यादव, दादाराव मोहोड आणि मनपा धरमपेठ झोनच्या विद्युत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.