२५ हजार शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:58 AM2020-10-06T11:58:52+5:302020-10-06T11:59:22+5:30
Farmer, Nitin Raut Nagpur News शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीजवाहिन्यांवरील सुमारे २५ हजार शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध करून देत ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरण करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करतेवेळेस त्या वीजवाहिन्यांवरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा भरणा करणे अपेक्षित आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.