पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसाठी हालचाली जोरात
By admin | Published: October 23, 2014 12:28 AM2014-10-23T00:28:07+5:302014-10-23T00:28:07+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर पुढील आठवड्यात २७ तारखेला विद्वत परिषद व व्यवस्थापन
नागपूर विद्यापीठ : २७ तारखेला विद्वत व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर पुढील आठवड्यात २७ तारखेला विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा होणार आहे. कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येईल. याच कालावधीत कुलगुरू पदासाठी जाहिरातदेखील प्रकाशित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
२५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ.विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. १०० वा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. परंतु पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास विलंब का होत आहे यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
निवडप्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून विद्यापीठातील विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा २७ आॅक्टोबर रोजी बोलविण्यात आली आहे. यातून कुलगुरू निवड समितीवर एका सदस्याची शिफारस करण्यात येणार आहे. हा सदस्य आपल्याच गटातील असावा यासाठी विद्यापीठात जोरदार राजकारण सुरू आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात विद्यापीठाच्या राजकारणात बदलते ‘रंग’ पहायला मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)