राज्य माहिती आयोगाचे कामकाज आता ‘ई-मेल’द्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:01 AM2020-05-20T11:01:24+5:302020-05-20T11:01:43+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. जर अर्जदारांनी सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती २० रुपयांचे स्टॅम्प लावून पाठविल्या तर तत्काळ सुनावणी आयोजित करण्याची व्यवस्था आयोगातर्फे करण्यात आली आहे.
‘लॉकडाऊन’मुळे राज्य माहिती आयोग नागपूर कार्यालयाचे कामकाज २४ मार्चपासून बंद करण्यात आले होते. दर महिन्याला या कार्यालयात केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियमांचे कलम १९(३) च्या तरतुदींनुसार अंदाजे साडेतीनशेच्या जवळपास द्वितीय अपील अर्ज व कलम १८ नुसार माहितीसंबंधी तक्रारी व त्याअनुषंगाने इतरही टपाल दाखल होतात. पोस्टाचे व्यवहार बंद असल्याने कार्यालयात अत्यल्प प्रमाणात टपाल प्राप्त होत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना कार्यालयात येणे शक्य नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंतरावरून अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून अपीलार्थी व तक्रारदार यांच्या अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत आहेत. तसेच सविस्तर खुलासेदेखील मागविण्यात येत आहेत. अनेक अपीलार्थी व तक्रारदार यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अर्जांवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच सर्व अपीलार्थी व तक्रारदार यांना ई-मेलवर नोटीस देणे, गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून त्यांना व्हॉट्सअॅप कॉल करून ऐकून घेणे, श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून ऐकून घेण्यासाठी मोठी अडचण भासत होती. त्या पार्श्वभूमीवर कामकाज सुलभ करण्यासाठी आयोगाने ई-मेलद्वारे कामकाजाचा निर्णय घेतला असल्याचे राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी कळविले आहे.