वनविभागाची जमीन मिळवून देण्याचा फंडा, कॉन्ट्रॅक्टरला २५ लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: April 8, 2024 04:35 PM2024-04-08T16:35:43+5:302024-04-08T16:37:02+5:30
ती झुडपी जंगलाची जमीन वनविभागाच्या मालकीची असून लीजवर सहजपणे आपण ती मिळवून देऊ असा दावा रितेशने केला.
नागपूर : वनविभागाची जमीन लीजवर मिळवून देण्याच्या नावाखाली एका प्रॉपर्टी डिलरने कंत्राटदाराला २५ लाखांचा गंडा घातला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुखदेव भवरलाल जांगीड (३९, लाडीकर ले आऊट) हे कंत्राटदार आहेत. २४ एप्रिल २०२३ रोजी त्यांची आरोपी रितेश उर्फ चंद्रकांत भैय्याजी राखुंडे (स्वरा अपार्टमेंट, नागोबा मंदिर मार्ग, मोखारे कॉलेजजवळ) याच्याशी ओळख झाली. रितेश हा प्रॉपर्टी डिलींगची कामे पाहतो. त्याने आऊटर रिंगरोडला लागून मौजा अड्याळी येथे असलेली जमीन जांगीड यांना दाखविली. ती झुडपी जंगलाची जमीन वनविभागाच्या मालकीची असून लीजवर सहजपणे आपण ती मिळवून देऊ असा दावा रितेशने केला. त्यावर ले आऊट टाकून तुम्ही विकू शकता असे आमिष त्याने दाखविले. वनविभागाकडून एनओसी घेण्याच्या नावाखाली त्याने जांगीड यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर त्याने कुठलेही काम केले नाही. त्याचा फोनदेखील स्वीच ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जांगीड यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रितेशविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे.
पत्नी वनविभागात असल्याची केली बतावणी
रितेशने त्याची पत्नी वनविभागात असून तिच्यामुळे स्वस्तात जमीन मिळत असल्याचे जांगीड यांना सांगितले. त्याने पत्नीशी फोनवर जांगीड यांचे बोलणेदेखील करवून दिले होते. त्याने गॅरंटी म्हणून मित्राचा ब्लॅंक चेकदेखील देण्याची तयारी दाखविली होती. रितेश याच्यावर अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.