अमलताश पर्यटन संकुलाला निधीचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:09 AM2021-02-25T04:09:52+5:302021-02-25T04:09:52+5:30
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या अमलताश पर्यटन संकुलाला अपुऱ्या निधीचा झटका बसला आहे. मागील १० महिन्यांचे विजेचे बिल ...
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या अमलताश पर्यटन संकुलाला अपुऱ्या निधीचा झटका बसला आहे. मागील १० महिन्यांचे विजेचे बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने या संकुलाचा पुरवठा दोन दिवसांपूर्वी कापला आहे.
मागील वर्षभरापासून वनविभागाकडून निधी न आल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पावर ऐन पर्यटन हंगामाच्या काळात ही नामुष्की ओढवली आहे. आता कुठे पर्यटनचा हंगाम जोर पकडत आहे. हळूहळू पर्यटक बाहेर पडायला लागले असतानाच निधीच्या टंचाईमुळे व्याघ्र प्रकल्पाला या नव्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिल - २०२० ते फेब्रुवारी -२०२१ या काळातील सुमारे १० महिन्यांचे १० लाख रुपयांच्या जवळपास वीज बिल थकीत आहे. कोरोनाच्या काळात पर्यटन बंद असल्याने व्यवसाय बुडाला. नंतर अनलॉकच्या प्रक्रियेत बऱ्याच विलंबाने वन पर्यटनाला परवानगी मिळाली. त्यानंतरही पर्यटकांचा ओघ कमीच होता. या सर्व बाबींचा परिणाम पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उत्पन्नावर झाला आहे. राज्य सरकारकडून निधी न आल्याने या अडचणीत पुन्हा भर पडली. कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण सुरू असतानाच या संकुलाची वीज कापली गेल्याने पेंच प्रकल्पातील अधिकारी प्रचंड अस्वस्थ आहेत.
अमलताश पर्यटन संकुलामध्ये एकूण ३० खोल्या असून २५ खोल्या वातानुकूलित आहेत. याच परिसरातील टायगर टेल ऑडिटोरियम हॉलमध्ये ४ वातानुकूलित यंत्र आहेत. सध्या पर्यटक येत असले तरी अडचण होऊ नये यासाठी जनरेटरवर काम भागविले जात आहे. पेंचसारख्या प्रकल्पातील पर्यटन संकुलावर अशी वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.