मंत्रिमंडळ मान्यतेनंतरच गोरेवाडाला निधी : चार टप्प्यात बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:43 PM2020-12-21T23:43:04+5:302020-12-21T23:44:41+5:30
Gorewada Zoo, nagpur news गोरेवाडाच्या विकासासाठी निधीची प्रतीक्षा आहे. या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात उच्च दर्जाच्या सोईसुविधा चार टप्प्यात निर्माण केल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव करून पाठविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडाच्या विकासासाठी निधीची प्रतीक्षा आहे. या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात उच्च दर्जाच्या सोईसुविधा चार टप्प्यात निर्माण केल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव करून पाठविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. आमदार राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई, वास्तूविशारद अशफाक अहमद आदी उपस्थित होते. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रकल्पाने निधीसाठी पाठविलेला प्रस्ताव पर्यटन मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवतील. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर आवश्यक निधी विविध टप्प्यात मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोरेवाडात बर्ड पार्कचा प्रस्ताव करा
गोरेवाडा येथे पक्ष्यांसाठीही जागा राखीव ठेवून तेथे बर्ड पार्क बनविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. आफ्रिकन सफारी, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आदी विविध विकास कामांसाठी आवश्यक निधीचा एकत्रित प्रस्ताव तयार करून तो पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आफ्रिकन सफारी वर्षभरात
पहिल्या टप्प्यातील पर्यटन सुविधांचे काम पूर्ण झाले असून, या टप्प्यात वाघ, बिबट्या, अस्वल आणि हरीण आदी चार जंगल सफारी सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात आफ्रिकन सफारीसाठी काम होणार असून, ते वर्षभरात पूर्ण करण्याचा गोरेवाडा प्रकल्पाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राऊत यांनी दिले.