नागपुरातील नाईक तलावाचा निधी थांबविला, संवर्धनही थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:29 AM2020-06-11T00:29:40+5:302020-06-11T00:31:06+5:30
शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकीच एक असलेल्या नाईक तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने या प्रकल्पाचा निधी थांबविला आहे. यामुळे संवर्धनाचे काम थांबले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकीच एक असलेल्या नाईक तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरणाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेने या प्रकल्पाचा निधी थांबविला आहे. यामुळे संवर्धनाचे काम थांबले आहे.
गत काळात या तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात होता. परंतु तलावाच्या सभोवताल झालेले अतिक्रमण व तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तसेच अतिक्रमणाचा विळखा वाढत चालल्याने तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तलाव संवर्धन योजनेंतर्गत महापालिकेने नाईक तलावाचे काम हाती घेतले आहे. ‘नीरी’ ने ३.८३ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर केला. पाच वर्षांत ५ लाख देखभाल खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार कामाला सुरुवात केली होती. परंतु शासनाकडून निधी प्राप्त झाल्याशिवाय पुढील काम करू नये, अशा सूचना मनपाच्या वित्त विभागाने कंत्राटदाराला दिल्या आहेत.
तलाव परिसरातील वस्त्यांतील सिवरेज व घाण पाणी तलावात सोडण्यात येत आहे. यामुळे पाण्याला दुर्गंधी येते. तसेच तलाव पात्रात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली होती. याचा विचार करता तलाव परिसरातील अतिक्रमण हटविणे, वाढलेली झुडपे व गाळ काढणे, तलावात सोडण्यात येणारे सिवरेज बंद करणे, तलाव परिसरातील सौंदर्यीकरण अशा स्वरूपाची कामे प्रस्तावित आहेत.
सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प
तलावात तीन सिवरेज लाईन सोडण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रदूषण होत असल्याने तलावात सोडण्यात येणारे सिवरेज रोखण्यासाठी १.८ एमएलडी क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. तलावाच्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. गांधीसागर तलावाच्या धर्तीवर या तलावाचा विकास केला जाणार आहे. परंतु मनपा प्रशासनाने निधी थांबविल्याने तलावाचे काम मागील दोन महिन्यापासून बंद असल्याची माहिती माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली.