क्रीडा क्षेत्रासाठी निधी कमी पडणार नाही
By admin | Published: March 29, 2015 02:28 AM2015-03-29T02:28:18+5:302015-03-29T02:28:18+5:30
क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेतली जाईल,
नागपूर : क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात दिले.
विदर्भ कॅरम संघटना, अखिल भारतीय कॅरम महासंघ आणि रॉय स्पोर्ट्स अॅण्ड सोशल मंडळातर्फे आयोजित ४३ व्या ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भात कॅरम खेळाला प्रतिष्ठा ही विदर्भ कॅरम संघटनेमुळेच मिळाली आहे. विविध खेळाच्या क्रीडा संघटनांच्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन क्रीडा धोरणात तरतूद करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. अकोला येथे विदर्भ कॅरम संघटनेला मिळालेली जागा संघटनेला ३० वर्षांच्या लिजची कायम व्यवस्था ३० दिवसांच्या आत करण्यात येईल.’ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी विविध राज्यातील खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे उद्घाटक केंद्रीय नगर विकास मंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले, तामिळनाडूच्या एका खेड्यातील मच्छिमाराच्या आर. इझाव्हजागी या २२ वर्षांच्या मुलीने मेहनत करूनच पाचव्या जागतिक कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. प्रत्येक खेळाडूंनी एकाग्रतेने मेहनत करावी आणि यशाचे शिखर गाठावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर विदर्भ कॅरम संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अजहर हुसैन, अखिल भारतीय कॅरम महासंघाचे उपाध्यक्ष संदीप पुंडकर, पी.के. हजारिका उपस्थित होते. याप्रसंगी वेंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांनी कॅरम खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिंगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रास्ताविक अखिल भारतीय कॅरम महासंघाचे महासचिव प्रभजितसिंग बछेर यांनी केले.संचालन व्ही.डी. नारायण यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)