निधीची पळवापळवी, सत्ताधाऱ्यांत जुंपली

By admin | Published: March 8, 2017 02:43 AM2017-03-08T02:43:31+5:302017-03-08T02:43:31+5:30

जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायलयीन प्रक्रियेत रखडल्यामुळे काही काळासाठी लांबल्या आहेत.

Fundraising of funds, jumped into the ruling class | निधीची पळवापळवी, सत्ताधाऱ्यांत जुंपली

निधीची पळवापळवी, सत्ताधाऱ्यांत जुंपली

Next

अध्यक्षांनी शिवसेनेला डावलले : जि.प. रंगतोय राजकीय कलगीतुरा
नागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायलयीन प्रक्रियेत रखडल्यामुळे काही काळासाठी लांबल्या आहेत. परंतु निवडणुकीचा निर्णय होण्यापूर्वी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त काम व्हावे, या अपेक्षेने जिल्हा परिषदेत सध्या निधीची पळवापळवी सुरू आहे. यात अध्यक्षांनी बाजी मारली असून, सत्ताधारी शिवसेनेच्या हाती काहीच न लागल्याने जि.प. भाजप-शिवसेनेत उघड्यावर कलगीतुरा सुरू झाला आहे. निधीच्या पळवापळवीत अध्यक्षांनी काँग्रेसच्या सदस्यांना हाताशी धरून शिवसेनेला डावलल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा निधी अध्यक्षांनी स्वत:च्या सर्कलमध्ये वळविल्याचा आरोप समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी केला होता.
अध्यक्ष निशा सावरकर यांनी हा निधी परस्पर आपल्या सर्कलमध्ये वळविल्यामुळे गेडाम यांनी वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून निधीचे वाटप थांबविले होते. या प्रकरणाला महिनाच लोटत नाही तर कृषी विभागाचा ३९ लाखाचा अखर्चित निधी अध्यक्षांनी पळविल्याचा आरोप उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केला. ३९ लाखाचा कृषी विभागाचा अखर्चित निधी बांधकाम विभागाकडे वळवून सर्व सदस्यांना समान वाटप करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला होता. परंतु अध्यक्ष, शिक्षण सभापती, काँग्रेसचे एक सदस्य व भाजपाच्या एका सदस्यांनी मिळून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या निता ठाकरे यांच्याशी संगनमत करून हा निधी चौघातच वाटून घेतला.
विशेष म्हणजे बांधकाम, कृषी विभागाच्या सदस्यांना सभापतींना याची कुठलीच माहिती दिली नाही. एवढेच नव्हे तर निधी वळता करून कामे देखील सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवसेनेच्या असलेल्या कृषी सभापती, बांधकाम समितीचे सभापती यांनी नाराजी व्यक्त करीत अध्यक्षांना टार्गेट केले.
उपाध्यक्षांनी याची तक्रार थेट विभागीय आयुक्तांकडे केली. अध्यक्षांच्या सुरू असलेल्या मनमानीवरही ताशेरे ओढले. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी सीईओंना चौकशी करून अहवाल मागितला आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचाही इशारा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

सीईओंचे प्रशासनावर नियंत्रण नाही
जि.प.च्या सीईओ कादंबरी बलकवडे यांनी रुजू झाल्यानंतर सुरुवातीला आपल्या प्रशासकीय कार्यशैलीची चुणूक दाखवून दिली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून जि.प.मध्ये सुरू असलेले प्रकार लक्षात घेता, सीईओंचा प्रशासनावर अंकुशच नसल्याचे दिसून येत आहे. निधीची पळवापळवी, सायकल वाटपातील घोळ, अधिकारी आणि काही ठराविक पदाधिकारी संगनमत करून जि.प. चालवित आहे. जि.प. तील कामांवर वचक कुणाचा, नेमके चालविते कोण, असे सवाल काही सदस्यांकडून केले जात आहे.

Web Title: Fundraising of funds, jumped into the ruling class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.