पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:09 PM2019-08-29T20:09:34+5:302019-08-29T20:10:20+5:30
नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील लोकांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. आपल्याकडून ‘फूल नाही फुलाची पाकळी’ मदत व्हावी ही भावना ठेवत मदतीसाठी सरसावले असून यात तरुणांचा सहभाग प्रेरणादायी असा राहिला आहे. हीच भावना जोपासत नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला.
न्याय वैद्यकशास्त्रच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मालोजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी ११ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळात मदत राशी जमा करण्याचे अभियान राबविले. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून थोडा थोडा निधी जमा केला तसेच शहरातील सीताबर्डी, धरमपेठ, महाल, इतवारी आदी परिसरात फिरून लोकांकडून मदत राशी गोळा केली. या मुलांच्या प्रयत्नातून ७० हजाराचा निधी व इतर साहित्य गोळा करण्यात आले व योग्य नियोजनाद्वारे प्रभावित भागात पूरपीडितांसाठी पाठविण्यात आले. विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.डी. आत्राम, प्रा. संजय ठाकरे व डॉ. वीरेंद्र शेंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या अभियानात विष्णूप्रसाद एन.एम., पूर्वजा गावंडे, अंजली ई.एस., उमेश भोयर, अथुल्या प्रसाद, मीनाक्षी आर.व्ही., दिलीप देव रॉय, नयना टि., दर्शना चापले, पवन चापले, मोनाली पौनीकर, शिवानी गोडके, पवन कल्याण आदी विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मालोजी भोसले यांनी सांगितले की, एनएसएसचा उद्देश केवळ कॅम्प आयोजित करणे हाच नाही तर सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा सुद्धा आहे. विद्यार्थ्यांनी जो काही निधी उभारून पूरग्रस्तांसाठी पाठविला, यातून त्यांची सामाजिक भावना जागृत असल्याचे दिसून येते.