तलाव बुजले; तलावाच्या दुरुस्तीचा निधीही आटला.. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 02:45 PM2022-11-30T14:45:17+5:302022-11-30T14:49:14+5:30
सिंचन विभागाची ७.६९ कोटींची मागणी
नागपूर : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धरणांचे दरवाजे उघडावे लागले होते. तलावही ओव्हरफ्लो झाले होते. अतिवृष्टीमुळे काही तलाव फुटले तर काही नादुरुस्त झाले होते. अशा १३५ तलावांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. दुरुस्ती न झाल्यास पुढील वर्षात मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. विचार करता लघु सिंचन विभागाने या तलावांच्या दुरुस्तीसाठी ७.६९ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे; मात्र चार महिने झाले तरी हा निधी मिळालेला नाही.
जिल्ह्यात ४७० तलाव आहेत. यातील १३७ तलाव नादुरुस्त झाले आहेत. यात उमरेड तालुक्यातील एक तर एक कुही तालुक्यातील तलाव फुटला होता. दुरुस्त न झाल्यास पुढील पावसाळ्यात यापासून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तलावांची दुरुस्ती न झाल्याने सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
नादुरुस्त तलावांची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने ७.६९ कोटींची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तलावांची आपत्कालीन निधीतून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र कायमस्वरुपी दुरुस्तीची गरज आहे. अधिकाऱ्यांकडून शासनाकडे यासाठी पाठपुरावा होताना दिसत नाही. यासंदर्भात जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेसच्या गटनेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता; परंतु त्यानंतरही हा निधी प्राप्त झालेला नाही.
निधीचा प्रस्ताव शासनाकडे
अतिवृष्टीचा फटका १३५ तलावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यासाठी ७.६९ कोटींच्या निधीची गरज आहे. यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र शासनाकडून हा निधी प्राप्त झालेला नाही.
तलाव संख्या
जिल्ह्यातील एकूण तलाव ४७०
- लघु सिंचन-१३४
- पाझर तलाव-६०
- गाव तलाव-३९
- मामा तलाव-२१४
- साठवण तलाव-२४