लॉकडाऊनमध्ये मृतांवर व्हावेत रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार; अनेक जण राहतात एकटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:53 AM2020-04-04T10:53:00+5:302020-04-04T10:53:36+5:30
कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीय व नातेवाईक जवळ नसलेल्या व्यक्तीचा लॉकडाऊनदरम्यान मृत्यू झाल्यास प्रशासनाने त्याच्यावर रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. याकरिता प्रशासनाने व्यवस्था उभी करावी, अशी भावना बंगळुरू येथील डॉ. दीपशिखा चक्रवर्ती यांनी शुक्रवारी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
दीपशिखा यांच्या वयोवृद्ध आई बाणी चक्रवर्ती या वाडी येथे एकट्या राहत होत्या. त्या ७३ वर्षांच्या होत्या. २ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊन लागू असल्यामुळे दीपशिखा व त्यांचे मुंबई येथे राहत असलेले भाऊ अनेक प्रयत्न करूनही वाडी येथे पोहचू शकले नाहीत. त्यामुळे दीपशिखा यांनी नागपूर येथे उच्च पदावर कार्यरत मैत्रिणीला फोन लावून आईवर शक्य त्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून घेतले. अशी वेळ कुणावरही येऊ शकते आणि जाग्यावरून सर्व व्यवस्था करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा घटना घडल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, असे मत दीपशिखा यांनी व्यक्त केले.
दीपशिखा यांचे वडील आयुधनिर्माणी अंबाझरी येथे अधिकारी होते. दरम्यान, त्यांनी वाडी येथे घर बांधले. त्यांच्या मृत्यूनंतर दीपशिखा व त्यांच्या भावाने आईला सोबत नेले. परंतु, आईचा वाडी येथेच राहण्याचा आग्रह होता. त्यामुळे त्या वाडी येथील घरी एकट्या राहत होत्या. त्यांच्या सेवेसाठी एक केअरटेकर व दोन नर्सेस ठेवल्या होत्या. दरम्यान, २ एप्रिल रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्यासारखे अनेक जण मुले व नातेवाईकांपासून दूर विविध ठिकाणी एकटे राहतात. लॉकडाऊनदरम्यान, अशी घटना घडल्यास कुटुंबीय व नातेवाईकांना वेळेवर संबंधित ठिकाणी पोहचणे अशक्य होऊ शकते. कोरोनामुळे शेजारीही पुढे येण्यास घाबरू शकतात. अशावेळी अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या परिस्थितीत प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. मृतदेहाची विटंबना होणार नाही याची काळजी घेऊन आणि रीतिरिवाज पाळून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली गेली पाहिजे, असे दीपशिखा यांनी सांगितले.