आत्महत्या करणाऱ्या जवानावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:37+5:302021-07-05T04:06:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लागण आणि नंतर शरीरावर झालेल्या दुष्परिणामामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्या प्रमोद शंकरराव मेरगुवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची लागण आणि नंतर शरीरावर झालेल्या दुष्परिणामामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणाऱ्या प्रमोद शंकरराव मेरगुवार (४६) यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सुटीवर असताना त्यांना हेडक्वॉर्टरमधून पिस्तूल कशी देण्यात आली, त्याची आता पोलीस चाैकशी करीत आहेत.
पाच वर्षांपासून विशेष सुरक्षा पथकात (एसपीयू) कार्यरत असलेले प्रमोद मानकापुरातील श्रीकृष्ण सभागृहाजवळ राहत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांना, त्यांची पत्नी दीपमाला, मुलगा वरुण आणि मुलगी सायली अशा चारही जणांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली. ते चांगले झाले. मात्र, त्यानंतर प्रमोद यांचे म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन झाले. त्यांचा एक डोळा निकामी झाला तर, दुसरा डोळ्याचीही नजर कमजोर झाली. त्यांच्यावर नागपूरसह हैदराबाद येथे उपचार करूनही लाभ झाला नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली. मनोबल खचल्यामुळे त्यांनी शनिवारी दुपारी १२.३० ते १ च्या सुमारास स्वताच्या तोंडात पिस्तुलाची नळी घेऊन ट्रिगर दाबला. डोके फोडून गोळी आरपार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी त्यांच्यावर शोकसंतप्त वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत धाडसी आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रमोदचा असा करुण अंत झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सुटीवर असताना २८ जूनला शस्त्रागारात प्रमाणपत्र देऊन प्रमोद यांनी पिस्तूल आणले. हे पिस्तूल त्यांना कसे आणि कुणी दिले. त्यासाठी त्यांना काही सूचनापत्र देण्यात आले होते का, याची चाैकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे.
----
कोण देणार आधार?
प्रमोदच्या कुटुंबात पत्नी दीपमाला (वय ३८), मुलगा वरुण (१७) आणि सायली (वय १२) नामक मुलगी आहे. त्यांच्या भावाच्या कुटुंबात वहिनी आणि त्यांची दोन मुले आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून प्रमोदच या सर्वांचा आधार होते. आजारापुढे हार पत्करत त्यांनीच स्वत:ला संपविल्यामुळे आता कोण आधार देणार, असा शोकविव्हळ सवाल त्यांचे कुटुंबीय करीत होते.
----