साश्रूनयनाने अंड्रस्कर कुटुंबावर अंत्यसंस्कार

By Admin | Published: June 27, 2017 01:59 AM2017-06-27T01:59:47+5:302017-06-27T01:59:47+5:30

जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली.

Funeral on the Undersker family | साश्रूनयनाने अंड्रस्कर कुटुंबावर अंत्यसंस्कार

साश्रूनयनाने अंड्रस्कर कुटुंबावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

जुना सुभेदार लेआऊटमध्ये पसरली शोककळा : हळहळ, अश्रू आणि अलोट गर्दी, प्रशासनाची संवेदनशिलता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली. त्यांच्या घरातून बाहेर निघताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हळहळ व्यक्त होत होती. एक अख्ख कुटुंब काश्मीरच्या गुलमर्गमध्ये झालेल्या अपघातात हिरावून गेले होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अख्ख्या कुटुंबीयांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले. सुभेदार लेआऊटच्या त्या गल्लीत लोकांनी एकच गर्दी केली होती. चार पार्थिव शेवटच्या विरामाकडे जात असतानाचा प्रसंग बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. मोक्षधाम घाटावर हजारोंच्या उपस्थितीत या कुटुंबीयावर अग्निसंस्कार करण्यात आले.
जयंत नामदेवराव अंड्रसकर, त्यांच्या पत्नी मनीषा, सात वर्षांची चिमुकली जान्हवी व पाच वर्षांची अनघा काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी रवाना झाले होते. ते परतीच्याच मार्गावर असताना त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झाली. या अपघातात अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू झाला. जयंत अंड्रस्कर हे सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे स्थायिक झाले होते. तेथे डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन विभागात कार्यरत होते. आई-वडील व भाऊ नागपुरात राहत असल्याने, त्यांच्या पार्थिवाला नागपुरात आणण्यात आले.
श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीवरून विमानाने मुंबई आणि मुंबईवरून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चारही पार्थिव नागपूर विमानतळावर पोहोचले. या पार्थिवासोबत जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे अधिकारी पवनसिंग सोढी नागपूर विमानतळापर्यंत आले होते. झालेली घटना अतिशय दु:खद असल्याने ईदची सुटी असतानाही अख्खे जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. महापालिकेच्या अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले.

आणि त्यांचे पार्थिवच आले
जयंत अंड्रस्कर यांची पत्नी मनीषा यांच्या भावाचे २८ मे रोजी लग्न झाले होते. त्यावेळी जयंत, मनीषा, जान्हवी आणि अनघा नागपुरात आले होते. त्यावेळी सर्वांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. जूनच्या ३० ला मनीषा यांच्या आईचे श्राद्ध होते. काश्मीरवरून आल्यानंतर २८ जूनला ते नागपुरात परतणार होते परंतु काळ आडवा आला. सोमवारी नागपुरात पोहचलेले त्यांचे मृत पार्थिव बघून अंड्रस्कर आणि वांढरे कुटुंब शोकमग्न झाले.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार
मोक्षधाम घाटवर एकाच वेळी आई-वडील व दोन मुलींचा अग्निसंस्कार होत असतानाचे दुर्मिळ दृश्य अनेकांनी बघितल्यावर प्रत्येकाचे काळीज फाटले होते. नीरव शांतता अख्ख्या घाटावर पसरली होती. या अंत्यसंस्काराला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत चौघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पार्थिव तीन तासापूर्वी नागपुरात
दिल्ली येथून मृत पार्थिवांना मुंबई येथे आणण्यात आले. पार्थिव सोमवारी रात्री ८ वाजता इंडिगो विमानाने नागपुरात पोहोचणार होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन पार्थिव लवकरात लवकर नागपुरात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३.१५ वाजताच्या जेट एअरवेजच्या विमानाने पार्थिव नागपुरात आणण्यात आले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, घटनेची गंभीरता व मानवीय दृष्टिकोन लक्षात घेता, प्रशासनाने पुढाकार घेऊन ईदची सुटी असतानाही निवासी जिल्हाधिकारी के. एन. राव यांनी पार्थिव घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.

Web Title: Funeral on the Undersker family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.