नागपुरातील बेकरीतल्या मोतीचूर लाडूमध्ये निघाली बुरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:21 AM2019-12-03T10:21:22+5:302019-12-03T10:24:26+5:30

अजनी चौकस्थित अजित बेकरीतील मोतीचूरचे लाडू खाल्ल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलींची प्रकृती अस्वस्थ झाली.

The fungus left in Motichur Ladu, a bakery in Nagpur | नागपुरातील बेकरीतल्या मोतीचूर लाडूमध्ये निघाली बुरशी

नागपुरातील बेकरीतल्या मोतीचूर लाडूमध्ये निघाली बुरशी

Next
ठळक मुद्दे दोन मुलींची प्रकृती अस्वस्थअजित बेकरीतील प्रकार अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी चौकस्थित अजित बेकरीतील मोतीचूरचे लाडू खाल्ल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलींची प्रकृती अस्वस्थ झाली. लाडू फोडून पाहिले असता लाडूच्या आत बुरशी आढळून आल्याने खळबळ उडाली. याची माहिती अजित बेकरीला दिली असता त्याने प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरीवर कारवाई व्हावी, या उद्देशाने सोमवारी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) लेखी तक्रार करण्यात आली आहे. लाडूचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
मंगेश गाकरे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी सोमवारी ‘लोकमत’ला येऊन आपबिती सांगितली. ते म्हणाले, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अजनी चौकातील अजित बेकरी येथून अर्धा किलो मोतीचूरचे लाडू विकत घेतले. घरी जात असताना सोबत असलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींनी काही लाडू खाल्ले. रात्री ९ वाजता दोघींचे पोट दुखू लागले. काही वेळाने उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तातडीने दोघींना इस्पितळात न्यावे लागले. दुसऱ्या दिवशी घरी लाडू फोडून पाहिले असता लाडूच्या आत बुरशी आढळून आली. याची माहिती अजित बेकरीला दिली.
अजित बेकरीमधून एक सहायक व्यवस्थापक घरी आला, सोबत त्याने मिठाईचे पॅकेट आणले होते. त्याने हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. परंतु लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणाची तक्रार ‘एफडीए’कडे करणार असल्याचे सांगून त्याला हाकलून लावले. सोमवार २ डिसेंबर रोजी ‘एफडीए’कार्यालयात यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली; सोबतच बुरशी लागलेले लाडूचे नमुने प्रयोगशाळेत जमा केले. गाकरे म्हणाले, हा लोकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार आहे. बुरशीजन्य खाद्यपदार्थ खाल्ल्याने भविष्यात कधीही कोणताही रोग होऊ शकतो. अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते. यामुळे कायद्यानुसार अजित बेकरीवर कारवाई व्हावी, हीच मागणी आहे. यासंदर्भात अजित बेकरी येथे फोन लावून त्यांची बाजू जाणून घेतली असता, बेकरीचे मालक झोपले असल्याचे सहायक व्यवस्थापक क्षितिज यांनी सांगितले.

Web Title: The fungus left in Motichur Ladu, a bakery in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.