मेयोच्या शस्त्रक्रियागृहाला लागले ‘फंगस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:35 PM2019-08-05T23:35:15+5:302019-08-05T23:36:26+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही तोच शस्त्रक्रियागृहामध्ये बुरशी (फंगस) लागली. परिणामी, अस्थिव्यंगोपचार (आर्थाेपेडिक), कान, नाक, घसा (ईएनटी) व नेत्ररोग विभागाचे शस्त्रक्रियागृह गेल्या २१ दिवसांपासून बंद पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्स तयार होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही तोच शस्त्रक्रियागृहामध्ये बुरशी (फंगस) लागली. परिणामी, अस्थिव्यंगोपचार (आर्थाेपेडिक), कान, नाक, घसा (ईएनटी) व नेत्ररोग विभागाचे शस्त्रक्रियागृह गेल्या २१ दिवसांपासून बंद पडले आहेत. सूत्रानुसार, बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने जंतुविरहीत हवेसाठी बसविलेल्या यंत्रणेमध्येच घोळ आहे. या यंत्रणेवर वर्षाला ३२ लाख रुपयांचा खर्च होत आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरण सामोर येण्याची शक्यता आहे.
मेयोमधील विखुरलेल्या इमारतीवर ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर व २०१० मध्ये जनहित याचिका दाखल झाल्याने २५० खाटांच्या सर्जिकल इमारतीचे बांधकाम सुरू झाले. अनेक घडामोडीनंतर ही इमारत एप्रिल २०१७ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाली. आर्थाेपेडिक, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना येथे प्राधान्य देण्यात आले. परंतु दोन वर्षे होत नाही तोच आर्थाेपेडिक, ईएनटी व नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना ‘फंगस’ लागले. सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे.
सूत्रानुसार, बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने या तीनही विभागाच्या प्रत्येकी शस्त्रक्रियागृहामध्ये स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा न लावता ‘हेफा फिल्टर’ लावले. यामुळे शस्त्रक्रिया गृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद केल्यास ‘मॉश्चर’ तयार होत आहे. यातूनच ‘फंगस’ लागल्याचे समोर आले आहे. परिणामी, गेल्या तीन आठवड्यांपासून शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेवर दरवर्षी ३२ लाख रुपये खर्च होतो. हा खर्च मेयो प्रशासनाला परडवणारा नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे सामोर येण्याचीही शक्यता आहे. मेयो प्रशासनाने या बाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्याचे समजते.