अफगाण नागरिकांच्या भावनांवर फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:10+5:302021-08-19T04:12:10+5:30
नरेश डोंगरे ! लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अफगाणिस्तानमधील सग्यासोयऱ्यांशी संपर्क तुटल्याने रडकुंडीला आलेल्या अफगाण नागरिकांची व्यथा लोकमतने प्रकाशित ...
नरेश डोंगरे !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अफगाणिस्तानमधील सग्यासोयऱ्यांशी संपर्क तुटल्याने रडकुंडीला आलेल्या अफगाण नागरिकांची व्यथा लोकमतने प्रकाशित करताच स्थानिक प्रशासनाने त्याची दखल घेतली. या पार्श्वभूमीवर शहरात शरणार्थी म्हणून राहणाऱ्या अफगाणी नागरिकांना बुधवारी पासपोर्ट कार्यालयात बोलावून घेत अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस करीत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
तालिबानी क्रौर्य जवळून बघणारे नागरिक अफगाणिस्तानमधून पळून जाण्यासाठी मृत्यूचा धोकाही पत्करायला तयार आहेत. त्यांची ही अवस्था परदेशात राहणाऱ्या अफगाणी नागरिकांना प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. दोन दिवसापासून नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने ते अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. नागपुरात ९५ अफगाणी शरणार्थी राहतात. या पार्श्वभूमीवर, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या अफगाणी नागरिकांशी विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारपासून संपर्क करून, त्यांना बुधवारी विशेष शाखेच्या कार्यालयात बोलावले. येथे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी त्यांच्या अफगाणमधील नातेवाईकांची माहिती घेऊन, त्यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अस्वस्थ मनावर अशा आस्थेवाईकपणे घातलेली फुंकर अफगाणी शरणार्थींच्या डोळ्यात अश्रूची गर्दी करणारी ठरली. अफगाणी नागरिकांच्या संबंधाने इमर्जन्सी व्हिजा पॉलिसी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने कुणी नागपुरात आले का, त्यासंबंधीची माहितीही आम्ही घेत आहोत, असे तेली यांनी लोकमतला सांगितले.
छोटी-मोठी कामे करून करतात उदरनिर्वाह
रिफ्यूजी म्हणून नागपुरात राहणारे अफगाणी नागरिक ब्लँकेट, चादर, फळे विकून तर कुणी हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करतात. यांच्यापैकी ९० टक्के व्यक्तींचे कुटुंबीय अफगाणमध्येच वास्तव्याला आहे.
‘अपनोकी खैरियत मिल जाये’
अफगाण शरणार्थी नागरिकांचे प्रमुख असलेले उस्मान खाँ यांच्याशी लोकमतने आज संपर्क केला. त्यांनी येथे काबाडकष्ट करून दोन घास सुखाचे मिळतात. त्यामुळे समाधानी आहोत, दुसरीकडे आपल्याच देशात आपल्या रक्ताचे नातेवाईक अत्यंत भयावह स्थितीत जीवन जगत असल्यामुळे आपल्याला अन्न गोड लागत नाही, असे ते म्हणाले. ‘अपनो की खैरियत मिल जाये, बस इतनीसी तमन्ना है’, असेही अनेक जण एका सुरात म्हणाले.