कॉटन मार्केटमध्ये भीषण आग
By Admin | Published: May 21, 2017 02:17 AM2017-05-21T02:17:56+5:302017-05-21T02:17:56+5:30
कॉटन मार्केट परिसरातील भाजीबाजारात शनिवारी दुपारी भीषण आग लागली.
३६ दुकाने जळून खाक : शॉर्ट सर्किटमुळे घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉटन मार्केट परिसरातील भाजीबाजारात शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत जवळपास ३६ दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कॉटन मार्केट येथील भाजी मार्केटमधील एका दुकानातून धूर निघू लागला. त्यामुळे आजूबाजूच्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले.
परिणामी आसपासच्या बासबल्लीने बनविलेल्या इतर दुकानांना आगीने कवेत घेतले. आगीचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. बाजारात नुसता गोंधळ निर्माण झाला. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर १५ बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून तब्बल तीन तास आग विझविण्याचे प्रयत्न केले. ही आग इतकी झपाट्याने पसरली की पाहता पाहता बाजूची ३६ दुकाने पेटली आणि त्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की दुरूनच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. आगीत वहीद भाई, नीलेश सोमकुवर, सम्राट श्याम लिल्हारे, जीवन धारकर, बोंदाडे, सुनील धारकर, दिनेश नायक , भय्यालाल आत्माराम ढोक, राम महाजन, जितू बांगडे, शशिकांत गौर आदी भाजी विकेत्यांच्या दुकानांची राखरांगोळी झाली. घटनेच्या वेळी काही व्यापारी व त्यांचे कर्मचारीही दुकानात उपस्थित होते तर काही दिवसभराचे काम आटोपून निघून गेले होते. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आगीने एवढ्या तीव्रतेने रौद्र रूप धारण केले की काही संधीच मिळाली नाही.
त्यामुळे अनेकांनी आपला जीव मुठीत धरून बाहेर पळ काढला. आगीत नेमके किती लाखांचे नुकसान झाले, त्याची आकडेवारी मिळू शकली नाही. नुकसानीचा आकडा लाखांत असल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात येत होते.