भरधाव टिप्परची अॅम्बुलन्सला धडक
By admin | Published: September 28, 2015 03:08 AM2015-09-28T03:08:31+5:302015-09-28T03:08:31+5:30
अपघातातील जखमी महिलेला नागपुरात उपचारासाठी आणणाऱ्या छिंदवाड्याच्या एका अॅम्बुलन्सला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली.
महिला ठार : पाच गंभीर जखमी
नागपूर : अपघातातील जखमी महिलेला नागपुरात उपचारासाठी आणणाऱ्या छिंदवाड्याच्या एका अॅम्बुलन्सला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. त्यामुळे अॅम्बुलन्समधील एका महिलेचा करुण अंत झाला तर पाच जण जबर जखमी झाले. मानकापूर चौकात उड्डाणपुलाखाली रविवारी पहाटे ३.३० वाजता हा भीषण अपघात घडला.
छिंदवाडा(मध्य प्रदेश)जवळच्या उमरेड गावातील सोनी कुटुंबातील एक महिला अपघातात जबर जखमी झाली होती. तिची प्रकृती बिघडत चालल्यामुळे तिला तिचे कुटुंबीय उपचारासाठी नागपुरात घेऊन येत होते. एका अॅम्बुलन्समधून(एमपी २८/ डीबी ०१६१) जखमी महिला आणि तिचे नातेवाईक रविवारी पहाटे ३.३० वाजता मानकापुरच्या उड्डाणपुलाखाली आले. त्याचवेळी वेगात आलेल्या १० चाकी टिप्पर(एमएच ३१/ सीबी ७९४१)च्या आरोपी चालकाने अॅम्बुलन्सला जोरदार धडक मारली. त्यामुळे विवेक विजय सोनी, विशाल सोनी, गायत्री सोनी, नंदू सोनी, रेणुका सोनी आणि मुन्नी नंदू सोनी हे सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना बाजूच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मुन्नी सोनी यांना मृत घोषित केले. एका जखमी महिलेला उपचारासाठी घेऊन येणारे सोनी कुटुंबातील पाच जण या अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांच्या गावातील १५ ते २० नातेवाईकांना आज येथे यावे लागले. दरम्यान, मानकापूर पोलिसांनी या अपघाताला दोषी असलेल्या टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)