रागाने पाहिल्याचा संताप, दोन सख्ख्या भावांकडून तरुणावर तलवारीने हल्ला
By योगेश पांडे | Published: March 7, 2024 05:42 PM2024-03-07T17:42:32+5:302024-03-07T17:42:49+5:30
नागपुरात शुल्लक कारणांवरून हत्येचे प्रकार वाढतच असून अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर : केवळ रागाने पाहिले या कारणावरून दोन सख्ख्या भावांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नागपुरात शुल्लक कारणांवरून हत्येचे प्रकार वाढतच असून अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे.
रितीक बोरकर (२४, इंद्रायणीनगर, गोरेवाडा) असे जखमीचे नाव आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. वर्षभराअगोदर एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याचा प्रतिक दिलीप सोनुले (२६, उत्थाननगर, गोरेवाडा) याच्यासोबत वाद झाला होता. बुधवारी रात्री रितीक गोरेवाडा चौकात खर्रा घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे वडील किशोर हेदेखील भाजी घेण्यासाठी पोहोचले. नेमका त्याच वेळी प्रतिक त्याचा भाऊ प्रज्योत (२६) याच्यासोबत पोहोचला. प्रतिकने रागाने का पाहिले या कारणावरून रितीकसोबत भांडण सुरू केले. रितीकच्या वडिलांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले. त्यानंतर दोघेही घराकडे निघाले असता प्रतिक व प्रज्योत दुचाकीने पोहोचले व त्यांना अडविले. त्यांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर प्रज्योतने गाडीतून तलवार काढली व रितीकवर वार केले. किशोर अडवायला गेले असता त्यांनादेखील मारले. रितीक रक्तबंबाळ झाल्यावर दोघेही तेथून पळून गेले. किशोर यांनी रितीकला मेयो इस्पितळात दाखल केले. डोळ्यासमोर मुलावर वार झाल्याने ते हादरले होते. त्या अवस्थेत त्यांनी मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना रात्री अटक केली.