मनपाच्या ऑनलाईन सभेचा फज्जा! गोंधळामुळे कामकाज तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:26 PM2020-08-20T22:26:29+5:302020-08-20T22:27:34+5:30
महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर संदीप जोशी यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर संदीप जोशी यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले.
शोकप्रस्तावाने सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अभिनंदन प्रस्ताव संपताच स्थगन प्रस्तावाचे वाचन करण्यात आले. मेयो, मेडिकल शासकीय रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध नाहीत. त्यात शहरातील मोजक्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचाराला परवानगी आहे. अशा स्थितीत रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा मुद्दा प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला.
काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी हा प्रस्ताव कुणी मांडला, असा प्रश्न उपस्थित केला. यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी हा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले.
महापौरांनी तिवारी यांचा प्रस्ताव स्वीकृत केला. मात्र दयाशंकर तिवारी हे ऑनलाईन नाहीत, असा आवाज आला. लगेच तिवारी हे आॅनलाईन आहेत, असे शब्द ऐकावयास आले. काँग्रेसचे कमलेश चौधरी मधेच बोलत असल्याने महापौरांनी सर्व नगरसेवकांना आपले मोबाईल म्यूट करण्यास सांगून दयाशंकर तिवारी यांना चर्चेला सुरुवात करण्यास सागितले.
यावर आमदार प्रवीण दटके म्हणाले, सभागृहात लिंक नीट नाही. अशाने सभागृह व्यवस्थित चालविणे शक्य नाही. कोणालाही ऐकू येत नाही, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही. महत्त्वाच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा होत आहे. आवाजच ऐकायला येत नसेल तर चर्चेला अर्थ नाही. त्यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. राजेंद्र सोनवणे, कमलेश चौधरी यांनीही तक्रार केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही अशा पद्धतीने सभागृहात चालत नाही योग्य नाही, अशी भूमिका मांडली. स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके, माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सभा सुरेश भट सभागृहात घेण्याची सूचना केली.
सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. परंतु प्रफुल्ल गुडधे बोलत होते. त्यावर दटके यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब झाली, असे त्यांना सांगितले.
सभागृहाचे पुन्हा लाईव्ह कामकाज सुरू होताच गोंधळाला सुरुवात झाली. अडचणी लक्षात घेता महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे त्यावरून अत्याधुनिक यंत्रणा कामाची नाही. अशा पद्धतीने सभागृहात चालणार नाही. ते योग्यही होणार नाही. प्रशासनाने तांत्रिक अडचणी उद्यापर्यंत दूर कराव्यात असे निर्देश देत सभेचे कामकाज तहकूब करून शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थगित सभा घेण्याचे जाहीर केले.
भट सभागृहात सभा घेण्यासाठी आग्रह
कोविड कालावधीत याआधीची सर्वसाधारण सभा सुरेश भट सभागृह घेण्यात आली होती. ही सभासुद्धा तेथेच घेण्यात यावी, असा आग्रह आजच्या लाईव्ह सभेत टेक्नोसेव्ही नसलेल्या अनेक नगरसेवकांनी केला. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरळीत होते की नाही याकडे लोकांचे लक्ष लागले आहे
मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत सभागृह घ्यावे!
कोविड काळात फिजिकल डिस्टन्स व नियमांचे पालन करून भट सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अमरावती महापालिकेत २५ टक्के नगरसेवकांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेची सभा मर्यादित नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्यात यावी. अन्य नगरसेवकाना ऑनलाईन जोडण्यात यावे, अशी मागणी सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली आहे.