रेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:34 AM2020-08-06T10:34:19+5:302020-08-06T10:36:12+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही.
दयानंद पाईकराव
नागपूर : देशभरात २०० विशेष रेल्वेगाड्या सुरू करताना रेल्वे बोर्डाने काही नियम लागूू केले होते. परंतु त्या नियमांची नागपूर रेल्वेस्थानकावर पायमल्ली होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही. विशेष रेल्वेगाड्या सुरू करताना रेल्वे बोर्डाने दोन प्रवाशांमध्ये एक मीटरचे अंतर राखण्याचे तसेच त्यांच्या तोंडाला मास्क गरजेचे असावे असा नियम लागू केला होता. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर या नियमांचा फज्जा उडत असल्याची स्थिती आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीत चढताना एवढी गर्दी होते की दोन प्रवाशांमध्ये एका फूटाचेही अंतर राहत नाही. बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकाची पाहणी केली असता ही बाब उजेडात आली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात तिकीट काऊंटरवर प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. तिकीट काढताना त्यांच्यात एका फूटाचेही अंतर नव्हते. आरक्षण कार्यालयाच्या परिसरातही प्रवासी एकमेकांच्या जवळ बसले होते. काही प्रवाशांच्या तोंडाला मास्कही नव्हता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
प्लॅटफॉर्मवरही नियमांकडे दुर्लक्ष
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर टाईल्स बसविण्याचे काम सुरू होते. तेथे चार कामगार काम करीत होते. परंतु तोंडाला मास्क न घालता ते सोबत काम करीत होते. परंतु त्यांना कुणीही हटकताना दिसले नाही.
रेल्वे बोर्डाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन प्रवासी करीत नसतील तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग