अक्षय तृतीयाच्या खरेदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:23 PM2020-04-26T22:23:54+5:302020-04-26T22:24:17+5:30
सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. सक्करदरा येथील बुधवारी भरणारा बाजार बंद केला आहे. परंतु रविवारी या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस विभागाचे वाहन गस्तीवर होते. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करीत होते. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात वर्दळ होती. सोशल डिस्टन्सिंगचा नागरिकांना विसर पडला होता. शहरातील कॉटन मार्केटमधील भाजीबाजार बंद करून मनपा आयुक्तांनी ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये बाजारांना परवानगी दिली. परंतु या बाजारात गर्दी होत असल्याने रेशीमबाग व राजाबाक्षा येथील बाजार बंद करावा लागला. अशीच परिस्थिती धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे भरणाऱ्या बाजारात आहे. होणाºया गर्दीमुळे परिसरातील नागरिकात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील कॉटन मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा बाजार बंद केला. येथे येणारे शेतकरी व येथील दलालांना आयुक्तांनी शहराच्या विविध भागात बाजार तयार करून व्यापाराची संधी दिली. नागरिकांनाही त्यांच्याच परिसरात भाजीपाला मिळावा, असाही आयुक्तांचा हेतू आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दुसरीकडे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने नागरिकात भीती वाढली आहे.
बाधित भागातून येणाऱ्यांना कसे ओळखणार
वस्त्यातील बाजारातूनही कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिकांच्या मनात घर केले आहे. शहरातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. भाजीपाला खरेदीसाठी येणारे नागरिक मास्क लावून केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. ज्या वस्त्यांना लागून बाजार सुरू करण्यात आले, तेथे विविध भागातून नागरिक येतात. त्यात कोण कुठून आले, बाधित भागातून आलेल्यांना कसे ओळखणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.