आठवडी बाजारात उपाययाेजनांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:11+5:302020-12-29T04:09:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहिसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना रामटेक शहरातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना संक्रमण पूर्णपणे नाहिसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना रामटेक शहरातील आठवडी बाजारात उपाययाेजनांचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामटेक शहरात रविवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात शहरासह परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी, शेतमजूर व नागरिक तसेच वीटभट्ट्या व इतर कामांवरील कामगार भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे या आठवडी बाजाराचे स्वरूप माेठे आहे. काेराेना संक्रमणाच्या सुरुवातीचे सहा महिने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन व साथ राेग नियंत्रण कायद्याचा आधार घेत गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजारांवर बंदी घातली हाेती. दिवाळीपासून पुन्हा आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली. यात रामटेक शहरातील आठवडी बाजाराचा समावेश आहे.
बाजारात खरेदी व विक्री करायला येणारी व्यक्ती काेराेना संक्रमित आहे की नाही, हे कळायला मार्ग नसतो. मात्र, नागरिक व दुकानदार या बाजारात मास्क न वापरता फिरत असून, खरेदी करताना दुकानांजवळ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन देखील करीत नाही. खाेकलताना किंवा शिंकताना ताेंडावर साधा रुमालही ठेवत नसल्याचे आढळून आले आहे. वास्तवात, काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ग्रामीण व शहरी भागात अधूनमधून काेराेना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
...
दंडात्मक कारवाई
शासनाने मध्यंतरी मास्क वापरणे अनिवार्य केले हाेते. मास्क न वापरणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जायची. ही कारवाई टाळण्यासाठी का हाेईना नागरिक विना मास्क घराबाहेर पडत नव्हते. प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे बंद करताच नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे.
....
नागरिकांनी त्यांच्या स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्कचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. कारण, काेराेनाचा धाेका पूर्णपणे टळलेला नाही. रामटेक शहरात काेराेनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे ते पुन्हा वाढू शकतात.
-बाळासाहेब मस्के,
तहसीलदार, रामटेक.