नागपूरच्या फुटाळा तलावातील तीन जीवांचे बळी क्रिकेट सट्ट्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:30 AM2018-02-04T00:30:47+5:302018-02-04T00:34:27+5:30
उपराजधानीसह पंचक्रोशीतील समाजमन सुन्न करणाऱ्या अंबाझरीतील सामूहिक आत्महत्येच्या करुणाजनक प्रकरणाशी क्रिकेट सट्टा, बुकी आणि लगवाडी करणारे जुगारी संबंधित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लोकमतला मिळालेल्या या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आॅफ द रेकॉर्ड दुजोरा मिळाला आहे. मात्र, अधिकारी उघड बोलायचे टाळतआहेत.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीसह पंचक्रोशीतील समाजमन सुन्न करणाऱ्या अंबाझरीतील सामूहिक आत्महत्येच्या करुणाजनक प्रकरणाशी क्रिकेट सट्टा, बुकी आणि लगवाडी करणारे जुगारी संबंधित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लोकमतला मिळालेल्या या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आॅफ द रेकॉर्ड दुजोरा मिळाला आहे. मात्र, अधिकारी उघड बोलायचे टाळतआहेत.
दोन भाऊ, तीन बहिणी, निवृत्त वडील, आई, काका त्या सर्वांची मुलं असा भरलेला परिवार. भलेमोठे स्वत:चे घर. घरात तो सर्वात लहान. त्याला सुस्वरूप पत्नी आणि पाच वर्षांची गोंडस चिमुकली. तो मोबाईलच्या दुकानात कामाला. त्यामुळे पैसाअडका कशाचीच कमतरता नव्हती. वरकरणी सारेकाही आलबेल. असे सगळे व्यवस्थित असताना निलेश पिलाजी शिंदे (वय ३५) याने पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह आत्मघात का करावा, असा प्रश्न तेलंगखेडीसह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य नागरिकांना पडला आहे. पोलिसांपुढेही हा प्रश्न आहेच अन् त्याचे उत्तर शोधण्यासाठी अंबाझरी पोलीस कामीही लागले आहेत.
तेलंगखेडीच्या मशिदीजवळ राहणारा नीलेश पिलाजी शिंदे (वय ३५), त्याची पत्नी रूपाली (वय ३२) आपल्या चिमुकल्या नाहलीसोबत आनंदात असल्याचे शुक्रवारी रात्रीपर्यंत सगळ्यांना भासत होते. शुक्रवारी रात्री ७ ते ८ च्या सुमारास नीलेश पत्नी आणि मुलीला घेऊन बाहेर गेला. रात्री परत आला. शिंदे परिवार संयुक्त कुटुंब पद्धतीत जगणारा. त्यामुळे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री त्यांनी एकत्रच जेवण केले. त्यानंतर नीलेश त्याच्या पत्नी आणि मुलीला घेऊन वरच्या माळ्यावरील शयनकक्षात गेला. त्याची भाची आज भल्या सकाळी शिकवणी वर्गाला जाण्यासाठी तयार झाली. मात्र, अंगणात अॅक्टिव्हा दिसत नव्हती. त्यामुळे ती वरच्या माळ्यावरील मामा(नीलेश)च्या रूमकडे गेली. दाराची कडी बाहेरून लावलेली. मात्र, आतमध्ये मामा, मामी किंवा चिमुकली नाहली यापैकी कुणीच नव्हते. भाचीने ही बाब मोठे मामा प्रदीप पिलाजी शिंदे यांना सांगितली. प्रदीपने कुठे गेला तो बायको मुलासह असा प्रश्न करीत आजूबाजूच्या भागात सकाळी ७ वाजता शोधाशोध सुरू केली. ते पायीच चालत फुटाळा तलावाकडे आले. तेथे त्यांना त्यांची दुचाकी तलावाच्या काठावर दिसली.
प्रदीपने तलावाच्या रॅम्पवरून बघितले असता चिमुकल्या नाहलीसारखा मृतदेह त्यांना आढळला. त्यांनी आरडाओरड केली. घरच्यांना कळविले. नंतर पोलिसांनाही सांगितले. अंबाझरी पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी तलावात शोधाशोध केली असता नाहली पाठोपाठ नीलेश आणि रुपालीचाही मृतदेह आढळला. ही वार्ता तेलंखेडी परिसरात माहीत होताच अख्खा मोहल्लाच तलावाकडे धावला. का केली असावी, नीलेशने पत्नी आणि मुलीसह आत्महत्या,असा प्रश्न चर्चेला आला. हाच प्रश्न घेऊन नीलेशचे कुटुंबीय आक्रोश करू लागले. पोलिसांनी पंचनाम्याची औपचारिकता पार पाडल्यानंतर चौकशी सुरू केली. त्यानंतर काही जणांकडून खळबळजनक माहिती पुढे आली.
सट्ट्याची खयवाडी अन् कर्जाचा डोंगर
मितभाषी नीलेशचा मोबाईल दुरुस्तीत हातखंडा होता. त्यामुळे त्याने दोन वर्षांपूर्वी एका मित्रासोबत मनीषनगरमध्ये मोबाईलचे दुकान सुरू केले. तो मोबाईलवर नवनवीन प्रयोग करून त्यातून दोष (बिघाड) शोधण्यासोबतच वेगवेगळी माहिती शोधण्यातही एक्स्पर्ट होता. त्याची बोटं मोबाईलच्या छोट्या बटनांवर लीलया फिरायची. यातून प्रारंभी तो गेम खेळायचा. त्यातून त्याला सट्टा आणि जुगाराचे व्यसन जडले. एका बुकीसोबत ओळख झाली अन् नंतर तो क्रिकेट सामन्यावर घेतल्या जाणाऱ्या सट्ट्याच्या गोरखधंद्यात ओढला गेला. तो खायवाडी करू लागला. त्यातून त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढला. त्यातून त्याचे दुकानही (विकले गेले?) बंद झाले.
३० लाखांचे घेणे अन् टाळाटाळ
सूत्रांच्या माहितीनुसार, नीलेशवर बुकींचे लाखो रुपये होते. ते वसूल करण्यासाठी त्याला त्यांच्याकडून त्रास व्हायचा. दुसरीकडे त्याचेही अनेक जुगाऱ्यांकडे लाखो रुपये थकले होते. रामनगरातील एका ‘आरोग्यसेवकाकडे’ त्याचे ३० लाख रुपये होते. तो ही रक्कम देण्यासाठी नीलेश आणि त्याच्या भागीदाराला टाळीत होता. १६ लाख रुपये देतो, असे सांगून त्याने नीलेशला प्रॉमिस केले होते, अशीही सूत्रांची माहिती आहे. तीन दिवसांपासून रक्कम देण्यासाठी त्याची सारखी टाळाटाळ सुरू होती. दुसरीकडे त्याला रक्कम मागणारे सारखे त्रास देत होते. त्यामुळे नीलेश कमालीचा वैफल्यग्रस्त झाला होता, त्यातूनच नीलेशने आत्मघाताचा मार्ग निवडला असावा, असा संबंधित सूत्रांचा कयास आहे. त्याच्या या आत्मघाती निर्णयात त्याची पत्नी रूपालीचे निरागस नाहलीसोबत सहभागी होणे साºयांच्याच मनाला चटका लावणारे ठरले आहे.
नीलेशचे सट्टा कनेक्शन रेकॉर्डवर
नीलेश बुक चालवीत होता, याची माहिती संबंधित वर्तुळासह अंबाझरीतून गेल्या वर्षी गुन्हे शाखेत व इतरत्र बदलून गेलेल्या पोलिसांना आहे; मात्र त्यांनी तूर्त चुप्पी साधली आहे. यासंबंधाने अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नीलेशचे क्रिकेट सट्टा कनेक्शन असल्याची माहिती आपल्याला मिळाली, असे मान्य केले. त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास झाला तर नीलेशसोबतच त्याच्या पत्नी आणि निरागस चिमुकलीचा बळी जाण्यास कारणीभूत असणाऱ्यांचे बुरखे फाटू शकतात.