शिल्पकलेचा नमुना ठरणार फुटाळा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 07:56 PM2020-09-30T19:56:22+5:302020-09-30T19:58:19+5:30
केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत फुटाळा परिसरातील रस्त्याचे पुनर्निर्माण कार्य महामेट्रोतर्फे जलद गतीने सुरू असून ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे महामेट्रो हा प्रकल्प राबवीत असून केंद्रीय रस्ते निधी (सीआरफ) अंतर्गत ११२.८९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे
या प्रकल्पांतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम व पावसाळी नालीचे तसेच दर्शक गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याची एकूण लांबी २.८६० किमी असून रुंदी १८ मीटर व २४ मीटर आहे. काँक्रिट रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूमिगत सेवा वाहिन्या पेव्हर ब्लॉकने आच्छादित असतील. संपूर्ण रस्त्यावर लाईट व्यवस्था आणि पावसाळी नाली रस्त्याच्या दोन्ही बाजूने तसेच त्यावर फुटपाथ असणार आहे. ३५० मीटर लांब दर्शक गॅलरीची क्षमता सुमारे ४,००० एवढी असेल. संगीत कारंजे शोकरिता येणाऱ्या दर्शकांना बसण्यासाठी गॅलरीचे काम प्रगतिपथावर आहे. गॅलरीला सहा प्रवेश राहणार असून तिकीट विक्री खिडकी व प्रसाधनगृह राहील. गॅलरीला टेन्साईल छत आणि आत रोषणाई राहणार आहे. त्यामुळे गॅलरीला स्टेडियमचे रूप येईल. तसेच संगीत कारंजाचे कंट्रोल टॉवर व प्रोजेक्टर रूमचे काम सुरू आहे. जमिनीवरील पेव्हर ब्लॉकमध्ये विविध प्रकारचे डिझाईन बनविण्यात आले आहेत, जे प्रकाशझोतात उठून दिसेल. बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था राहील. तसेच लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे व विविध कलाकृती (शिल्पकलेचे पुतळे) लागणार आहेत.