फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:31 PM2019-09-23T22:31:22+5:302019-09-23T22:32:19+5:30

विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

Futala, Sakkadara on Saline: Lake condition after Ganapati immersion | फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

Next
ठळक मुद्देपर्यावरणवादी संस्थेने केले तलावातील पाण्याचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : तलाव हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. पूर्वी तलावाचा उपयोग व्हायचा. मात्र आता तलाव हे फक्त धार्मिक विसर्जनासाठी वापरले जातात. विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत असल्याने महापालिकेने यावर्षी फुटाळा सोडल्यास चार तलावावर निर्बंध घातले. विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. तर सोनेगाव व गांधीसागर तलावाची अवस्था ठिकठाक असल्याचे दिसते आहे.
‘अर्थ इको इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ग्रीन व्हिजिल संस्थेने गणपती विसर्जनानंतर शहरातील चार मुख्य तलावांचे निरीक्षण केले. संस्थेने गणपती विसर्जनापूर्वीसुद्धा तलावाचे निरीक्षण केले होते. विसर्जनानंतर केलेल्या निरीक्षणात फुटाळा व सक्करदरा तलावाच्या पाण्यात प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणात त्यांनी तलावातील पाण्याचे पीएच, गढुळपणा व पाण्यात मिसळलेले ऑक्सिजन याचे परीक्षण केले. या परीक्षणात गणपती विसर्जनाचा सर्वाधिक फटका फुटाळा तलावाला बसल्याचे दिसून आले. गणपती विसर्जनापूर्वी फुटाळ्यात ऑक्सिजनची मात्रा ४ ते ४.५ मिलीग्रॅम होती. विसर्जनानंतर ३ ते ३.५ मिलीग्रॅम नोंदविण्यात आली. तलावाच्या पाण्यात गढुळपणासुद्धा वाढल्याचेही दिसून आले. तलावातील पाण्याचा पीएच मात्र कायम होता. सक्करदरा तलावात गणपती विसर्जनावर निर्बंध घातले होते. परंतु तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभ आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेवर परिणाम झाला आहे. तलावातील पाण्यात गढुळपणा वाढला असून, पीएच कायम आहे.
गांधीसागर व सोनेगावची स्थिती बरी
मनपाने गांधीसागर व सोनेगाव तलावात गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या. येथे विसर्जन झाले नाही. त्यामुळे या दोन्ही तलावाच्या पाण्याच्या ऑक्सिजनच्या मात्रेत फारसा फरक पडला नाही. गढुळपणाही कमी आढळून आला. तलावातील पीएच बऱ्यापैकी आहे.
 तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणाम
तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड ऑक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रॅमपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते. तसेच सक्करदरा तलावातील जलकुंभ साफ करणे गरजेचे आहे.
सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन व्हिजिल

Web Title: Futala, Sakkadara on Saline: Lake condition after Ganapati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.