फुटाळा सलाईनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:40 AM2017-09-07T01:40:33+5:302017-09-07T01:41:03+5:30

गणेश विसर्जनाची व्यवस्था यशस्वीपणे पार पाडली असली तरी, येत्या काही दिवसांत फुटाळा तलावाच्या स्वच्छतेचे आव्हान महानगरपालिकेला पेलावे लागणार आहे.

Futalah on the saline! | फुटाळा सलाईनवर!

फुटाळा सलाईनवर!

Next
ठळक मुद्देतलावाचे आॅक्सिजन धोक्याच्या पार जाण्याची शक्यता : सात दिवसांत स्वच्छतेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश विसर्जनाची व्यवस्था यशस्वीपणे पार पाडली असली तरी, येत्या काही दिवसांत फुटाळा तलावाच्या स्वच्छतेचे आव्हान महानगरपालिकेला पेलावे लागणार आहे. केवळ फुटाळ्यात मूर्ती विसर्जनाला परवानगी असल्याने त्याचे परिणाम विसर्जनानंतर दिसायला लागले आहे. पाण्यावर तरंगताना दिसणारा कचरा आतमधील जलचरांसाठी धोक्याचे संकेत देणारा आहे. या कचºयामुळे तलावातील आॅक्सिजनची पातळी धोक्याची शक्यता गाठण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्यामुळे तलावाचे परितंत्र नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महापालिकेने यावर्षी सोनेगावसह गांधीसागर आणि सक्करदरा या तीन तलावांवर विसर्जन करण्यास बंदी घातली होती आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. गणेशभक्तांनी घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला पसंती देत मनपाच्या प्रदूषणविरोधी आवाहनाला चांगला प्रतिसादही दिला. मात्र फुटाळा तलावावर विसर्जनाला परवानगी देण्यात आली होती. विशेषत: सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने तलावाला लागून कृत्रिम तलावांची व्यवस्थाही केली होती व अनेकांनी पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देत या कृत्रिम केंद्रांवर विसर्जन केले. मात्र तलावातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारेही कमी नव्हते.
तलाव परिसरात पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन करण्यासाठी मनपाच्या कर्मचाºयांसह अशासकीय सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. अशा विविध एनजीओंकडून मिळालेली अंदाजित आकडेवारी धक्कादायकच म्हणावी लागेल.
फुटाळ्याच्या वायुसेनानगर साईटकडे शेवटच्या दिवशी १६,७२९ केवळ घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी रात्री १२ पर्यंत १०,१३५ गणपती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्याची नोंद आहे, म्हणजेच ६,५०० च्यावर मूर्तींचे तलावातच विसर्जन करण्यात आले. हा आकडा मागील वर्षीपेक्षा चारपट अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी त्या भागात शेवटच्या दिवशी ३,७८५ मूर्तींचे विसर्जन झाले, त्यापैकी २,४२९ मूर्ती कृत्रिम तलावात गेल्या होत्या.
फुटाळा वस्ती भागात मंगळवारी कृत्रिम तलावात २,७०० आणि एक दिवसाआधी १००० मूर्ती विसर्जित झाल्याचे सांगण्यात येत आहे. फुटाळा वस्ती आणि चौपाटीसह विचार केल्यास घरगुती आणि मंडळाच्या मिळून ६० हजाराच्यावर मूर्ती तलावात विसर्जित करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आकडाही मागील वर्षीपेक्षा चारपट जास्त आहे. संपूर्ण गणेशोत्सव काळाचा विचार केला तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तलावातील आॅक्सिजनची अवस्था
संपूर्ण शहरातील मूर्तींच्या विसर्जनाचा भार फुटाळा तलावावर पडल्याने साहजिकच त्याचे परिणाम या तलावात दिसून येत आहेत. तलावात सर्वत्र पसरलेले निर्माल्य, मूर्तींच्या रंगांचे रसायन, पाण्यावर तरंगणाºया पीओपीच्या मूर्ती यामुळे तलावाच्या परितंत्रात मिसळलेल्या आॅक्सिजनचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीची आकडेवारी पाहता याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ग्रीन व्हिजिल या संस्थेतर्फे मिळालेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी फुटाळा तलावातील आॅक्सिजनचे प्रमाण विसर्जनापूर्वी ३.५ मिलिग्रॅम/लिटर होते, जे विसर्जनानंतर २.५ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत घसरले होते. गांधीसागर तलावाचे प्रमाण विसर्जनापूर्वीच्या ४.५ वरून विसर्जनानंतर ३.५ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत खाली आले होते. सोनेगाव तलावात विसर्जनाला मागील वर्षीही बंदी असल्याने तेथे परिणाम झाला नव्हता.
स्वच्छता आवश्यक
ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, महापालिकेने विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली होती, मात्र जनतेचेही सहकार्य अपेक्षित होते. तीन दिवसांत तलावातील कचरा सडायला सुरुवात होईल व त्यामुळे परितंत्रावर परिणाम जाणवायला लागेल. आॅक्सिजनचे प्रमाण २ मिलिग्रॅम/लिटरच्या खाली गेले तर तलावातील जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सात दिवसांत तलावातील हा संपूर्ण कचरा बाहेर काढणे आवश्यक ठरणार आहे. लाखो नागरिकांनी केलेले प्रदूषण महापालिकेच्या तोकड्या कर्मचाºयांकडून पेलविणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
 

Web Title: Futalah on the saline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.