-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:54 AM2019-11-29T10:54:32+5:302019-11-29T10:57:18+5:30

सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

-But in the future the battle for water is inevitable | -तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

-तर भविष्यात पाण्यासाठी युद्ध अटळ

Next
ठळक मुद्देजीएसआयचे महासंचालक मेश्राम भूजल स्रोत व पाणीसंकटावर राष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याची परिस्थिती बघता २०५० पर्यंत अर्ध्या जगाला पाणी टंचाईच्या अत्याधिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारत सरकार १०० स्मार्ट शहर निर्मितीचा प्रकल्प राबवित आहे, मात्र प्रत्येक नागरिकासाठी दररोज लागणारे १५० लिटर पाणी उपलब्ध आहे का, हा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील सरकारांनी पाण्याचे नियोजन केले नाही तर भविष्यात होणारे युद्ध हे पाण्यासाठी असेल, अशी चिंता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक एस. एन. मेश्राम यांनी व्यक्त केली.
गोंडवाना जिओलॉजिकल सोसायटी (जीएसआय) तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीजी जिओलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात भूजल आणि जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांसमोरील आव्हाने’ या विषयावर धरमपेठ येथील वनामती येथे दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. याच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे विभागीय संचालक डॉ. पी.के. जैन, ओसीडब्ल्यूचे सीईओ संजोय रॉय, जीजीएसचे अध्यक्ष व परिषदेचे संयोजक डॉ. अंजन चटर्जी, विद्यापीठाच्या जिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. ए.एम. पोफरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डीजी एस.एन. मेश्राम पुढे म्हणाले, पाण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला, हे इतिहासात सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. वर्तमान काळात आपल्या जवळच महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक व तामिळनाडू तसेच भारत व चीन यांच्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सर्वांसाठी शुद्ध व पिण्यायोग्य पाणी हा सुद्धा शाश्वत विकासाचा भाग आहे. पाणी संकट हे अंदाजाने नाही तर सर्वेक्षणाने मांडण्यात येत आहे. २०५० पर्यंत हे संकट अत्याधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे जलसंवर्धनाचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने आताच या दिशेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तिसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. भूजल पातळी खाली घसरत आहे, कावेरी व गोदावरी आदी नद्यांचे पात्र घटत चालले आहे. आपल्यासमोर केवळ पाणीटंचाईचे संकट उभे आहे, असे नाही तर पाण्याच्या प्रदूषणाचेही मोठे संकट उभे ठाकले आहे. जीएसआय सातत्याने यावर सर्वेक्षण करीत असते व यामध्ये प्रदूषणाच्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आपण स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासाच्या गोष्टी करतो, मात्र सर्वांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळावे, हा सुद्धा या संकल्पनेचा भाग ठरावा, अशी भावना मेश्राम यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. काणे म्हणाले, हवा, पाणी व नैसर्गिक संपदेमध्ये वाढलेला मानवी हस्तक्षेप हे संकटाचे कारण आहे. हे आव्हान थोपविण्यासाठी आर्थिक धोरण राबविण्याची गरज डॉ. काणे यांनी व्यक्त केली. आयोजन सचिव ए.एम. वराडे यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय भूजल संवर्धन मंडळाचे भूषण लामसोंगे यांनी आभार मानले. दोन दिवसीय परिषदेमध्ये पाणी संवर्धनाशी संबंधित विविध विषयावर तज्ज्ञांद्वारे विचार मांडण्यात येणार आहेत.

Web Title: -But in the future the battle for water is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.