भविष्यातील संशोधकांना मिळाले नवे ‘व्हिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:17 AM2017-08-31T01:17:50+5:302017-08-31T01:18:09+5:30
‘सीएसआयआर’अंतर्गत (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) लागलेल्या विविध शोध तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ‘नीरी’त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीएसआयआर’अंतर्गत (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) लागलेल्या विविध शोध तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी ‘नीरी’त महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी या महाप्रदर्शनाचा समारोप झाला. तीन दिवसांत हजारो शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांनीदेखील येथे भेट दिली. ‘सीएसआयआर’ व ‘नीरी’चे काम पाहून भविष्यातील संशोधकांना विज्ञानाकडे पाहण्याची नवीन प्रेरणाच मिळाली.
‘सीएसआयआर’अंतर्गत येणाºया कृषी, पर्यावरण, रसायन आणि पेट्रोकेमिकल, पाणी, ऊर्जा, अभियांत्रिकी, जेनेरिक औषधे, अन्न व पोषण इत्यादी क्षेत्रात काम करणाºया संस्थांच्या कामगिरीवर येथे प्रकाश टाकण्यात आला होता. सोमवारी या महाप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तिन्ही दिवस मिळून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या महाप्रदर्शनाला भेट दिली. अखेरच्या दिवशी सुटी असूनदेखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कुटुंबीयांसमवेत आले होते. याशिवाय काही शेतकºयांनीदेखील तंत्रज्ञानाबाबत जाणून घेतले. प्रदर्शनामध्ये जलशुद्धीकरणासाठी ‘हॉलो फायबर मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी’, सौरऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञान, आॅटोमॅटीक युरिनल फ्लशर, प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती इत्यादी ‘मॉडेल’चे सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत वैज्ञानिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. अनेक विद्यार्थ्यांनी तर स्वत:च्या डोक्यातील कल्पना येथे मांडल्या. काही विद्यार्थ्यांना ‘नीरी’ने सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित केले आहे.
अखेरच्या दिवशी पर्यावरणावर मार्गदर्शन
बुधवारी विद्यार्थ्यांसाठी दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ‘नीरी’च्या वैज्ञानिक डॉ.शालिनी ध्यानी यांनी ‘शहरी संहार आणि पर्यावरणावर आधारित दृष्टिकोन’ या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर डॉ.रिमा बिस्वास मंडल यांनी पृथ्वीवरील लहान जीवजंतू पर्यावरणाशी निगडित मोठमोठ्या समस्या सोडविण्यासाठी किती फायदेशीर ठरतात यावर प्रकाश टाकला.