फ्युचर रिटेलचे मानवेंद्र शर्मा यांच्याविरुद्धचा गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:58+5:302021-06-18T04:06:58+5:30
नागपूर : फ्युचर रिटेल कंपनीच्या महिला विभागाचे प्रमुख मानवेंद्र ज्ञानेंद्र शर्मा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी नोंदवलेला धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा ...
नागपूर : फ्युचर रिटेल कंपनीच्या महिला विभागाचे प्रमुख मानवेंद्र ज्ञानेंद्र शर्मा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी नोंदवलेला धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल या गुन्ह्याचे आरोपपत्र रद्द करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शर्मा यांना हा दिलासा दिला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महिलांच्या वस्त्रांवर विशिष्ट धर्मग्रंथांमधील पवित्र वाक्ये छापल्यामुळे अजय बोढारे यांनी शर्मा व इतरांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. शर्मा यांनी सप्टेंबर-२०१५ मध्ये कुलवाल हॅण्डीक्राफ्ट कंपनीकडून विवादित वस्त्रे तयार करून घेतली होती. न्यायालयाने शर्मा यांना दिलासा देताना सदर गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांचा तक्रारीमध्ये समावेश नसल्याचे मत व्यक्त केले. शर्मा यांनी विशिष्ट धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावण्यासाठी मुद्दाम व वाईट हेतूने विवादित वस्त्रे तयार केली असा आरोप तक्रारीत कुठेच करण्यात आला नाही. त्यामुळे गुन्हा कायम ठेवल्यास कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. कुलवाल हॅण्डीक्राफ्ट कंपनीविरुद्धचा गुन्हा यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे.