ग्रामसभेत ठरणार सरपंचाचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:30+5:302021-02-23T04:11:30+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला ...
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) या गटग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला आणि ताे विशेष सभेत सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. कृष्णा उईके यांनी सरपंचपदी थेट मतदारांमधून निवड करण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये साेमवारी (दि. २२) विशेष ग्रामसभा बाेलावली आहे. या ग्रामसभेत या ठरावावर मतदान घेतले जाणार असून, त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डी. जी. जाधव यांनी दिली.
सरपंच कृष्णा उईके व ग्रामसेवक यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेत उपसरपंचासह इतर सदस्यांनी त्यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर निर्णय घेण्यासाठी ९ फेब्रुवारी राेजी आयाेजित केलेल्या विशेष सभेत हा ठराव सहा विरुद्ध एक मताने पारित करण्यात आला. या सभेला उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीता काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर उपस्थित होते. सरपंच उईके यांची निवड थेट मतदारांमधून करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर विशेष ग्रामसभेत मतदान करून निर्णय घेण्यात येणार आल्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्याने साेमवारी विशेष नारसिंगी येथे विशेष ग्रामसभेचे आयाेजन केले आहे. प्रशासनाने ही विशेष ग्रामसभा घेण्याची घाई केली, असा आराेप काही नागरिकांनी केला आहे.
...
काेराेना काळात मतदान
सध्या काेराेना संक्रमण वाढत आहेे. त्यातच सरपंचाच्या भवितव्यासाठी विशेष ग्रामसभा व त्यात मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, काेराेनामुळे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका काही काळ पुढे ढकलण्यात आल्या हाेत्या. ग्रामसभेत हाेणारी नागरिकांची गर्दी काेरानाच्या पथ्यावर पडू शकते, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली असून, केवळ राजकीय दबावामुळे या काळात मतदान घेण्यात येत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे काही ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे दाेन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यावर अद्याप निवडा देण्यात आला नाही, असे कृष्णा उईके यांनी सांगितले. तर, ही ग्रामसभा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार बाेलावली असल्याचे तहसीलदार डी. जी. जाधव यांनी सांगितले.