छात्रसेनेच्या कॅडेट्सचे भविष्य उज्ज्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:04+5:302021-07-01T04:07:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. या कठाेर सैनिकी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. या कठाेर सैनिकी प्रशिक्षणाचे अनेक फायदे आहेत. यामुळे नाेकरीच्या अनेक संधी असून, छात्रसेनेच्या कॅडेट्सचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन २० महाराष्ट्र एनसीसी बटालियन नागपूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमाेद चांदना यांनी केले.
स्थानिक डाॅ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयात सदिच्छा भेटीप्रसंगी कर्नल अमाेद चांदना यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कॅडेट्सकडून एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षेची तयारीसुद्धा करून घेण्यात आली. कर्नल चांदना पुढे म्हणाले, सद्य:स्थितीत नाेकरी मिळणे कठीण झाले; परंतु एनसीसी कॅडेट्सकरिता विशेष सूट मिळते. याचा छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी निश्चित लाभ घ्यावा. एनसीसी कॅडेट्सना लष्करी सेवेत अधिकारी बनता येते. त्यांच्यासाठी राखीव जागा उपलब्ध असतात. शिष्यवृत्तीचा लाभ मिळताे. यावेळी त्यांनी एनसीसीच्या साहसिक प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी प्राचार्य डाॅ. वीरेंद्र जुमडे यांच्या हस्ते कर्नल अमाेद चांदना यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मेजर बाबा टेकाडे, फर्स्ट ऑफिसर अशाेक चाैहान, प्रीतम टेकाडे, भुनेश्वर बाेबडे, सुभेदार कश्मीर सिंग, हवालदार समीर साळुंके, प्रा. डाॅ. विकास सावंत तसेच एनसीसी कॅडेट्स उपस्थित हाेते.