भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल : पुण्यप्रसुन वाजपेयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:05 AM2019-08-04T01:05:28+5:302019-08-04T01:06:39+5:30
भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५७७७ क्युबिक मीटर पाणी मिळत होते. २०१२ मध्ये १५४५ क्युबिक मीटर आणि २०१९ मध्ये १३४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. विकासकामांचे कारण पुढे करून झालेली भरमसाट वृक्षतोड,सिमेंटचे रस्ते, पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५७७७ क्युबिक मीटर पाणी मिळत होते. २०१२ मध्ये १५४५ क्युबिक मीटर आणि २०१९ मध्ये १३४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. विकासकामांचे कारण पुढे करून झालेली भरमसाट वृक्षतोड,सिमेंटचे रस्ते, पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून भविष्यात पैसा असेल तरच पाणी मिळेल,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर पुण्यप्रसून वाजपेयी यांनी आज येथे केले.
कॉंग्रेस विचार जनजागृती अभियानाच्यावतीने वनामतीच्या सभागृहात ‘जल है तो कल है’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. अनिस अहमद, महापालिकेचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल गुडधे पाटील उपस्थित होते. वाजपेयी म्हणाले, भारतात ५४३८ मिलियन डॉलरचा पाण्याचा व्यवसाय होतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु कृषीवरच देशात सर्वात कमी काम होते. हरियाणा, राजस्थानात गार्इंच्या चराईसाठी असलेल्या जमिनीवर राजकीय नेत्यांनी ताबा मिळविला आहे. देशात कुठलाही प्रकल्प सुरू होण्यापूवी पर्यावरण मंत्रालय चौकशी करून त्या प्रकल्पामुळे निसर्गाचे नुकसान होते काय याची पाहणी करते. परंतु इंदिरा गांधीनंतर कुणालाच पर्यावरणाची चिंता उरली नाही. २००९ ते २०१४ दरम्यान कॉंग्रेसने १ कोटी २ लाख वृक्ष तोडले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात २०१४ ते २०१९ दरम्यान विकास कामांच्या नावाखाली १ कोटी ९ लाख ७५ हजार ८४४ झाडे तोडली. त्यामुळे पाण्याचे संकट उभे राहणार होते. कार्पोरेट कंपन्याही आपला सीएसआरचा निधी पाणी, वायु प्रदूषणावर खर्च करण्यास तयार नसून त्यांचा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकल्पांसाठी वापरण्यात येत आहे. सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे पिल्लरमुळे पाण्याची पातळी दोन मीटर खाली जाते. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणांबाबत कुणीच काही बोलण्यास तयार नसून जनतेमध्ये जाऊन जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नितीन राऊत म्हणाले, विकासाचे चित्र रंगवित २४ बाय ७ पाणी देण्याचे आश्वासन देऊन आठवड्यातून तीन दिवस पाणी मिळत आहे. कोची धरणाचे काम शासनाने केले नाही. नागपूरची लोकसंख्या ४५ लाख झाल्यास काय करावे याचे नियोजन राज्यकर्त्यांकडे नाही. सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढले असून आधी नोटबंदीमुळे आणि आता पाण्यासाठी रांगा लागत आहेत.
प्रास्ताविकातून तानाजी वनवे यांनी नागपुरातील भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, त्यावर मंथन करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असून, विदर्भात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात एव्हरेस्ट शिखर सर करणारे प्रणय बांडेबुचे, रशियन वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मिळविणारे सागर गुर्वे, तबला, म्युझिकमध्ये क्वालालम्पूरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे वंश शुक्ला, हाफीस अन्सारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.