जी-20 परिषद : भारतीय परंपरेने होणार पाहुण्यांचे स्वागत, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:25 AM2023-03-08T10:25:27+5:302023-03-08T11:35:20+5:30

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सी-२० परिषदेच्या पाहुण्यांचे विमानतळावरील स्वागताबाबत नियोजनाचा आढावा घेतला.

G-20 members will be welcomed in Indian tradition; District Collector reviewed | जी-20 परिषद : भारतीय परंपरेने होणार पाहुण्यांचे स्वागत, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जी-20 परिषद : भारतीय परंपरेने होणार पाहुण्यांचे स्वागत, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

googlenewsNext

नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत सिव्हिल सोसायटी अर्थात सी-२० च्या प्रारंभीक परिषदेचे आयोजन शहरात २० ते २२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त बैठकीला येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्याचे नियोजन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

सी-२० परिषदेच्या पाहुण्यांचे विमानतळावरील स्वागताबाबत नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी घेतला. विमानतळ येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, मिहान विमानतळ संचालक आबीद रूही, सहव्यवस्थापक अमित कासटवार, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

- असे होणार पाहुण्यांचे स्वागत

सी-२० परिषदेत सहभाग नोंदविण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिती स्थापन केली आहे. विमानतळावर पाहुण्यांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येणार आहे. स्वागत कक्षात भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना फेटा बांधण्यात येईल तसेच महिलांना नऊवारी साडी नेसवून मेहंदी लावण्यात येईल. पाहुण्यांना टिळा लावून ओवळण्यात येईल व सेवाग्राम येथील सूतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी शहनाईचे वादनदेखील करण्यात येणार आहे. पाहुण्यांना विमानतळ ते वाहनापर्यंत विद्यार्थ्यांची टिम नृत्य करत घेऊन जाईल. तसेच नियोजित राहण्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर हॉटेलच्या गेटपासून आतपर्यंत विद्यार्थ्यांची लेझीम टीम त्यांना वाजतगाजत घेऊन जाणार आहे.

- संपर्क अधिकारी नेमणार

येणाऱ्या पाहुण्यांना कोणतीही अडचण जाऊ नये यासाठी विमानतळावर विशेष मदत केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाहुण्यांसाठी प्रत्येक देशनिहाय संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून भाषेची अडचण होऊ नये म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांच्यासोबत राहून दुभाषकाचे काम करतील.

याशिवाय विमानतळावर त्यांचे सामान वहनासाठी विशेष व्यवस्था राहील. आकस्मिक सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टिम, रुग्णवाहिका, अग्निरोधक यंत्रणा तसेच अतिरिक्त वाहतूक सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. बैठकीत प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.

Web Title: G-20 members will be welcomed in Indian tradition; District Collector reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.